लोकसंस्कृती..संबळ… तुणतुणं..

 डॉ. गणेश चंदनशिवे

देवी उत्सवात गोंधळ हा तिच्या उपासनेचा महत्त्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे गोंधळात वाजवली जाणारी वाद्यही वैशिष्टय़पूर्ण असतात.

महाराष्ट्र असो वा निरनिराळी राज्ये असोत, कोणत्याही शुभकार्यात वाद्ये वाजविली जातात. वाद्ये वाजवली नाहीत तर कोणतेही शुभकार्य पूर्णच होऊ शकत नाही असे म्हटले तर त्यात काहीच वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रातील त्यातीलच एक कला प्रकार म्हणजे गोंधळ. गोंधळामध्येदेखील वाद्ये वाजवली जातात. त्यामध्ये प्रामुख्याने संबळ व तुणतुणे या वाद्यांचा वापर केला जातो.

महाराष्ट्रात घराण्याचा कुलाचार म्हणून काही ठिकाणी देवीच्या उपासना विधीच्या प्रसंगी गोंधळाचा प्रयोग केला जातो. गोंधळ हे वैशिष्टय़पूर्ण असे विधिनाटय़ आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नृत्य, नाटय़, संगीत आणि कथा या गोष्टींचा समावेश होतो. गोंधळाप्रमाणेच खंडोबाच्या उपासनेचा एक भाग म्हणून वाघ्या-मुरळीचे जागरण करण्याची प्रथाही काही घराण्यांत रूढ आहे. गोंधळ आणि जागरण या विधिनाटय़ाचे स्वरूप व विचार स्वतंत्रपणे असतात.

देवीचा गोंधळ करणारे गोंधळी परशुराम हा आपला मूळ पुरुष आहे असे मानतात.

गोंधळात मुख्यतः तुणतुणे, संबळ व झांज अशी वाद्ये वाजवली जातात. गोंधळातील वाद्ये ही परंपरेनुसार उठलेली असतात. त्यात संबळ व तुणतुणे ही प्रमुख वाद्ये आहेत. संबळाची रचना ही वैशिष्टय़पूर्ण असते. कपाच्या आकाराची दोन भांडी वेत किंवा दोरीच्या सहाय्याने कातडी मढवलेली अशी संबळाची रचना असते. त्याला जोडसमेळ असेही म्हटले जातो. जोडसमेळातील दोन्हीही खोड लाकडी असतात आणि त्याचा आस एक वीत असतो.

समेळात नर व मादी असे दोन प्रकार असतात. त्यापैकी नर समेळ डग्ग्याचे बोल तर मादी समेळ तबल्याचे बोल पुरवितो. दोन्ही समेळांत बकऱयाच्या कातडीची पुडी असते. नर समेळावर डग्ग्यासारखी शाई असते. समेळ वेताच्या काठीने वाजविला जातो. ही वेताची काठी समेळ ज्या बाजूस वाजविला जातो त्या बाजूने गोलाकार आकार देऊन वळवलेल्या असतात. संबळाचे वादन कडक व ताल पुरविणारे असते.

गोंधळातील दुसरे मुख्य वाद्य म्हणजे तुणतुणे. तुणतुणे जवळजवळ सगळय़ाच लोकनाटय़ प्रकारात वाजविले जाते. हातात धरण्याइतकी जाड अशी दोन- अडीच फुटांची बांबूची काठी घेऊन तिच्या तळाशी पोकळ मोठय़ा आकाराचे लाकडी नळकांडे बसवलेले असते व त्याला बकऱयाची कातडीने मढवले जाते. कातडय़ाच्या मध्यापासून ते बांबूच्या वरच्या टोकापर्यंत तार खेचून बसवतात आणि बांबूत खोचलेल्या छोटय़ा खुंटीस ती तार बांधली जाते. असे हे तुणतुणे लाकडाच्या तुकडय़ाने वाजवले जाते. तुणतुणे हे लोकरंगभूमीचे एक अविभाज्य घटक असते असे म्हटले तरी चालेल.