राज्यसभेसाठी महाआघाडीची मोर्चेबांधणी, महिनाभरात होणार निवडणुकीची घोषणा

1932
parliament

विधानसभा सदस्यांतून राज्यसभेवर निवडून गेलेल्या 7 खासदारांची मुदत 2 एप्रिल रोजी संपत आहे. पक्षीय बलानुसार महाराष्ट्र विकास आघाडीचे 3 उमेदवार तर भाजपचे 3 उमेदवार निवडून येणार हे निश्चित मानले जात आहे. मात्र चुरस होणार आहे ती सातव्या जागेसाठी. ही जागा कोण स्वतःकडे खेचून आणू शकतो यासाठी जोरदार मोर्चेबांधणीला आतापासूनच सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले 7 खासदार 2 एप्रिलमध्ये निकृत्त होत असून फेब्रवारी महिन्यात या जागांसाठी निवडणुकीची घोषणा होणार आहे. निकृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये भाजपच्या कोटय़ातून निवडून आलेले रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, भाजपच्या पाठिंब्यावर राज्यसभेवर गेलेले अपक्ष संजय काकडे, भाजपचे अमर साबळे, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ऍड. माजीद मेमन यांचा समावेश आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला सत्तेबाहेर बसावे लागले आहे तर महाराष्ट्र विकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे राज्यातील सत्तेची समीकरणे बदलली गेली आहेत.

विधानसभा निवडणुकीत भाजपाचे 105, शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसेचे 54, काँग्रेस 44, मनसे 1, सपा 2, शेकाप 1, बहुजन विकास आघाडी 3 तसेच अपक्ष मिळून 288 आमदार जिंकून आलेले आहेत. अपक्षांच्या पाठिंब्यावर महाराष्ट्र विकास आघाडीकडे 170 आमदारांचे तर भाजपाकडे अपक्षांसह 115 आमदारांचे संख्याबळ आहे. राज्यात सत्ता स्थापन करताना आघाडी सरकारने समान कार्यक्रम ठरवला आहे. त्यानुसार आगामी राज्यसभेची निवडणूकही एकत्रितपणे लढण्याचा निर्धार सरकारने केला आहे. राज्यसभेच्या 7 जागांचा विचार केल्यास प्रत्येकाला किमान विधानसभेतील 37 आमदारांची मते मिळणे अपेक्षित आहे.

अपक्षांची मते निर्णायक
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षीय बलाबल पाहिल्यास तिन्ही पक्षांचा प्रत्येकी 1 खासदार तर भाजपाचे 3 खासदार सहज जिंकून येऊ शकतात. मात्र, सातव्या जागेसाठी अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. अपक्षांच्या पाठिंब्यावरच भाजपच तिसरा उमेदवार जिंकू शकतो, तर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेची शिल्लक राहणारी मते अधिक अपक्षांच्या मतांवर आघाडीचा चौथा उमेदवार जिंकून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या