प्रजासत्ताक दिनी राज्यात ‘शिवभोजन’ थाळीचा शुभारंभ

3619

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात ‘शिवभोजन’ उपलब्ध करुन देण्याच्या योजनेचा शुभारंभ आज रविवारी झाला. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत राज्यात ठिकठिकाणी शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये, तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या योजनेचा मुंबईत शुभारंभ केला. आर्थिक स्थिती चांगली आहे अशांनी या योजनेचा लाभ घेऊ नये, असे आवाहन अजित पवार यांनी नागरिकांना केले. तर पोटाला जात, पात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त आणि दर्जेदार आहार मिळावा हेच या योजनेचे उद्दिष्ट आहे, असे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

ajit-pawar

पुणे महानगरपालिका भवनाच्या निशिगंध हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘शिवभोजन’ योजनेचा शुभारंभ झाला. या योजनेचा लाभ अधिकाधिक गोरगरीब आणि गरजू लोकांना मिळेल, असा विश्वास असल्याचे ते यावेळी म्हणाले.

aaditya1

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत शिवभोजन योजनेचा शुभारंभ केला. मुंबई उपनगरातील महसूल कर्मचाऱ्यांच्या उपहारात ही 10 रुपयांत मिळणाऱ्या थाळीचे उद्घाटन करण्यात आले. पोटाला जात, धर्म आणि आर्थिक स्थितीचे निकष न लावता सर्वांना स्वस्त दरात आणि ते देखील दर्जेदार जेवण असलेली थाळी मिळावी हाच या योजनेमागील उद्देश असल्याचे आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.

subhash-desai

गरीब, गरजूंना सवलतीच्या दरात जेवण उपलब्धतेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुढाकारातून शिवभोजन योजना सुरू झाली. जिल्हा सामान्य रुग्णालयात या योजनेचा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी आमदार अंबादास दानवे, जिल्हाध‍िकारी उदय चौधरी, डॉ. सुंदरराव कुलकर्णी आदी उपस्थित होते.

eknath-shinde

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून राज्यातील गोरगरीब जनतेला अल्पदरात म्हणजे केवळ 10 रुपयांत पोटभर जेवण उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू केलेल्या शिवभोजन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या लोकमान्य नगर व यशोधन नगर येथील केंद्रांचा उद्घाटन सोहळा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

pratap-sarnaik

मीरा भाईंदर येथील महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येत असलेल्या शिवभोजन केंद्राचे उद्घाटन प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उप महापौर चंद्रकांत वैती, विरोधी पक्ष नेता प्रविण पाटील, नगरसेवक, नगरसेविका शिधावाटप केंद्राचे विभागीय अधिकारी व स्थानिक नागरीक उपस्थित होते.

kc-padvi

नंदुरबारचे पालकमंत्री अॅड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते जिल्हा शासकीय रुग्णालयात शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांना थाळीचे वाटप करण्यात आले.

satej-patil

सुभाष रोड येथील रुद्राक्षी स्वयं महिला बचत गट संचलित आण्णा रेस्टॉरंट येथे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत शिवभोजन थाळी योजनेचा प्रारंभ करण्यात आला.

aslam-shaikh

मुंबई सेंट्रल येथील नायर धर्मादाय रुग्णालय कँन्टिनमध्ये पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते गरीब व गरजू जनतेला शिवभोजन थाळी देऊन मुंबई शहरातील योजनेला सुरुवात करण्यात आली. यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर आदी उपस्थित होते.

abdul-sattar

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते बसस्थानकात शिवभोजन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवभोजन थाळी…
शिवभोजन थाळीमध्ये भात, डाळ, दोन चपात्या, भाजी, लोणचे असे पदार्थ आहेत. थाळीचे शहरात आणि ग्रामीण भागात वेगवेगळे दर ठेवण्यात आले आहेत. गोरगरीब नागरिकांना पोटभर जेवण मिळावे हाच या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेअंतर्गत महिलांना किंवा महिलांच्या बचत गटांना हे काम देण्यात येणार आहे. एका केंद्रावर कमीत कमी 75 आणि जास्तीतजास्त 150 थाळ्यांचे वाटप होणे अपेक्षित आहे.

आपली प्रतिक्रिया द्या