मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षयवर गुन्हा दाखल, बलात्कार आणि गर्भपाताचे आरोप

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्यावर बलात्कार आणि जबरदस्तीने गर्भपात केल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाक्षय याच्यासोबत त्याची आई आणि मिथुन यांची पत्नी योगिता बाली हिच्याविरुद्धही आरोप करण्यात आले आहेत.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, तक्रारदार महिला ही व्यवसायाने मॉडेल आहे. महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, महाक्षय याच्यासोबत 2015पासून तिचे प्रेमसंबंध होते. महाक्षयने तिला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. त्यावेळी आश्वासन देऊन त्याने तिच्याशी शारीरिक संबंधही प्रस्थापित केले होते. जेव्हा या नात्यात महिला गर्भवती राहिली, तेव्हा त्याने तिला गर्भपात करण्यासाठी सांगितलं.

महिलेने याला नकार दिला तेव्हा तिच्यावर दबावही आणला गेला. महिला जुमानत नसल्याचं पाहून त्यांनी तिला काही गोळ्या देऊन तिचा गर्भपात केल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, जबरदस्तीने गर्भपात करवण्यामागे महाक्षयसोबत त्याची आई योगिता बाली ही देखील सहभागी होती, त्यामुळे त्यांच्यावरही आरोप करण्यात आले आहेत.

महाक्षय याच्यावर आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. दोन वर्षांपूर्वी एका भोजपुरी अभिनेत्रीने महाक्षयवर लग्नाचं आश्वासन देऊन बलात्कार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता. त्यावेळीही योगिता बाली यांचं नाव त्या आरोपात होतं. दिल्ली येथील रोहिणी कोर्टाने महाक्षय आणि योगिता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी या प्रकरणामुळे महाक्षयचा होऊ घातलेला विवाहही अडचणीत सापडला होता.

महाक्षय चक्रवर्ती याने वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. सध्या बराच काळ महाक्षय चंदेरी पडद्यापासून दूर आहे.

आपली प्रतिक्रिया द्या