महाबळेश्वर, कोयनेच्या पट्ट्यात पावसाचा धुमाकूळ

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असून, महाबळेश्वरपासून कोयनेपर्यंतच्या पट्टय़ात पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. दमदार पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाणीसाठा झपाटय़ाने वाढत चालला आहे. त्यामुळे कण्हेर, उरमोडी, तारळी, धोम-बलकवडी धरणांसह वांग मराठवाडी प्रकल्पांमधून मोठय़ा प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत.

सातारा जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी असली तरी सातारा, कराड, वाईसह पश्चिम भागात जोरदार पाऊस पडत आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 24 तासांत कोयनानगरला 228, नवजाला 184, तर महाबळेश्वरला 242 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या तुफान बॅटिंगमुळे कोयना धरणातील पाणीसाठय़ात दोन दिवसांत दहा टीएमसीवर पाण्याची वाढ झाली आहे.

जिल्ह्यातील सर्व प्रमुख धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा 140.86 टीएमसी असतो. आजमितीला हा पाणीसाठा 109.05 टीएमसीवर (77.42 टक्के) पोहोचला आहे. कोयना व धोम वगळता कण्हेर (8219 क्युसेक), उरमोडी (4779 क्युसेक), तारळी (2021 क्युसेक), धोम-बलकवडी (2054 क्युसेक) तसेच वांग मराठवाडी धरण प्रकल्पामधून (1513 क्युसेक) विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत.

कोयना धरणात 24 तासांत पाच टीएमसी पाणी

– कोयना धरणांतर्गत विभागात सध्या संततधार पाऊस पडत असल्याने धरणांतर्गत विभागातील छोटय़ा नद्या, नाले, ओढे, धबधब्यातून प्रतिसेकंद सरासरी 60 हजार 117 क्युसेक पाण्याची आवक होत असल्याने धरणातील पाणीसाठय़ात लक्षणीय वाढ होत आहे. धरणात सध्या उपलब्ध पाणीसाठा 80.45 टीएमसी झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी यापुढे 24.80 टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. पावसाचा जोर व पाण्याची आवक अशीच राहिली, तर येत्या आठवडय़ाभरात धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहेत. मागील चोवीस तासांत पाणीसाठय़ात 4.97 टीएमसीने, तर पाणी उंचीत 5.7 फूट वाढ झाली आहे.