दहावीतील विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाचा अत्याचार, महाबळेश्वरात खळबळ, नराधम गजाआड

 

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकाने वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून, नराधम मुख्याध्यापकाच्या महाबळेश्वर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. जागतिक महिला दिनीच विद्यार्थिनीवर होत असल्याच्या अत्याचाराच्या घटनेमुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.

दिलीप रामचंद्र ढेबे (वय 50, रा. मेटगुताड, महाबळेश्वर) असे अटक करण्यात आलेल्या नराधम मुख्याध्यापकाचे नाव आहे. दिलीप ढेबे मुख्याध्यापक असलेल्या हायस्कूलमध्ये त्याच्या जवळच्या नात्यातील एक मुलगी इयत्ता 10वीमध्ये शिकत आहे. या मुलीच्या असहायतेचा फायदा उठवीत नराधम मुख्याध्यापक ढेबे याने तिच्यावर प्रयोगशाळा आणि हॉलमध्ये वेळोवेळी अत्याचार केले.

या घटनेबाबत एका जागरूक नागरिकाने ‘चाईल्ड हेल्पलाइन 1098’ या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार दिली. पोलीस दलाने या तक्रारीची गंभीर दखल घेत हा तपास महाबळेश्वर पोलिसांकडे वर्ग केला होता. पाच दिवस तपास करून पोलिसांनी पीडित विद्यार्थिनीचा शोध घेतला. तिला विश्वासात घेतल्यानंतर तिने होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी नराधम मुख्याध्यापक दिलीप ढेबे याच्या मुसक्या आवळल्या. ढेबेने गुह्याची कबुली दिली आहे. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी तपास करीत आहेत.

 

 

आपली प्रतिक्रिया द्या