म्हाडाच्या एका घरावर ७३ जणांचा डोळा

33

सामना ऑनलाईन । मुंबई

म्हाडाच्या यंदाच्या घर लॉटरीत ‘ऐतिहासिक’ घसरण झाली आहे ८१२ घरांसाठी जेमतेम ६० हजार जणांनी अर्ज केले असून एका घरावर ७३ जणांनी डोळा ठेवला आहे. गेल्या वर्षी एका घरामागे १४० अर्ज दाखल झाले होते. आर्थिक दुर्बल घटकांतील मुंबईकरांना मात्र ‘म्हाडा’शिवाय पर्याय नसल्याचेच समोर आले आहे. कारण लॉटरीत त्यांच्यासाठी फक्त ८ घरे असली तरी त्यासाठी ७२०० जणांनी अर्ज केले आहेत, तर सर्वात महागडय़ा दोन कोटींच्या दोन घरांसाठी ८६ अर्ज आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यंदाच्या लॉटरीची सुरुवातीपासूनच बोंब झाली होती. म्हाडाची घरे बाजारभावापेक्षा किती तरी महाग असल्याची चर्चा होती आणि त्यामुळेच बहुधा मुंबईकरांनी लॉटरीकडे पाठ फिरवली असावी. गेल्या ८ वर्षांच्या इतिहासात लॉटरीला पहिल्यांदाच अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

– लोअर परळमध्ये उच्च उत्पन्न गटातील आणखी ३४ घरे. घरांची किंमत १ कोटी ४२ लाख रुपये. यासाठी ३८५ अर्ज दाखल.
– पवई तुंगा येथील उच्च उत्पन्न गटासाठीच्या १६८ घरांसाठी दीड हजार अर्ज दाखल. या घरांची किंमत प्रत्येकी एक कोटी.

प्रतिसादाच्या शोधात म्हाडाने अर्ज भरण्याची मुदतही वाढवली. जिथे एका घरासाठी २०० अर्ज यायचे तेथे यंदा फक्त ७३ अर्जच आले आहेत.

एकूण अर्ज ६० हजारांच्या ‘घरात’ आले आहेत. २००९ मध्ये ३८६३ घरांसाठी साडेचार लाख, २०१० मध्ये साडेतीन लाख, २०११ मध्ये दीड लाख, २०१६ मध्ये ९१० घरांसाठी १ लाख ३५ हजार अर्ज आले होते. यंदा मात्र मुंबईकरांनी ‘म्हाडाचे महागडे घर नक्को रे बाबा’ असेच म्हटले आहे.

लोअर परळ येथे उच्च उत्पन्न गटातील दोनच घरे आहेत. एका घराची किंमत १ कोटी ९५ लाख रुपये आहे. या दोन घरांसाठी ८६ अर्ज प्राप्त झाले आहेत.

महागडय़ा घरांना सर्वसामान्यांनी नाकारल्याने ‘म्हाडा’ला हा मोठा झटका मानला जातो. नोंदणी फक्त ४० टक्केच झाली आहे. आता लॉटरी १० नोव्हेंबरला फुटेल.

आपली प्रतिक्रिया द्या