महालक्ष्मी, जोतिबा देवस्थानला हायकोर्टाचा दिलासा नाहीच, जुने सुरक्षा रक्षक काढून नवीन नेमण्यास अंतरिम स्थगिती

कोल्हापूर येथील महालक्ष्मी व जोतिबा मंदिरातील जुने सुरक्षा रक्षक काढून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे रक्षक नेमण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी मंदिर ट्रस्टला परवानगी दिली नाही. जुने सुरक्षा रक्षक काढून नवीन नेमणूक करण्यास दिलेली अंतरिम स्थगिती पुढील सुनावणीपर्यंत कायम राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व जनरल कामगार युनियनचे रक्षक या दोन मंदिरांच्या सेवेत 2016 पासून आहेत. महालक्ष्मी मंदिरात 49 तर जोतिबा मंदिरात दहा रक्षक आहेत. या सुरक्षा रक्षकांना काढून महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे शस्त्रधारी रक्षकांची नेमणूक मंदिर ट्रस्टला करायची आहे. तसे पत्र त्यांनी दिले. याविरोधात या सुरक्षा रक्षकांनी अॅड. अविनाश बेळगे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.