महालक्ष्मी, माहुलमध्ये 1600 ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग प्रकल्प सुरू

खर्चात तब्बल 40 टक्के बचत आणि वाहतुकीचा वेळ वाचवणारे स्वतःचे ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग प्रकल्प पालिकेने सुरू केले आहेत. यामुळे स्वतः प्राणवायू पुनर्भरण उभारणारी मुंबई देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. यात माहुलमध्ये 15 मेट्रिक टन प्राणवायू वापरून 1500 जम्बो सिंलिडर्स तर महालक्ष्मी प्रकल्पामध्ये 100 ते 120 डय़ुरा सिलिंडर्स भरण्याची क्षमता आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या दोन्ही प्रकल्पांचा आज शुभारंभ करण्यात आला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढल्याने पालिकेसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र पालिकेने योग्य नियोजन केल्यामुळे कोणतीही आणीबाणीची स्थिती निर्माण झाली नाही. योग्य नियोजनामुळे एका रात्री तर 150 रुग्णांना सुरक्षितरीत्या दुसऱ्या रुग्णालयात हलवल्याने त्यांचे प्राण वाचले. या पार्श्वभूमीवर पालिकेने वैद्यकीय प्राणवायू पुनर्भरण व साठवण प्रकल्प उभारण्याचा निश्चय केला. हे आता प्रकल्प आता प्रत्यक्षात आल्याने मुंबईसाठी मोठी सुविधा निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन या वेळी आदित्य ठाकरे यांनी केले. या वेळी महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, खासदार राहुल शेवाळे, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू, बीपीसीएलचे मुख्य व्यवस्थापक एन. चंद्रशेखर, प्रभाग समिती अध्यक्ष दत्ता नरवणकर, नगरसेवक श्रीकांत शेटय़े, अनिल पाटणकर, नगरसेविका अंजली नाईक, उपायुक्त रमाकांत बिरादार, उपआयुक्त विश्वास शंकरवार, सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे, शरद उघडे, पृथ्वीराज चौहान, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मुंबईचे स्पिरीट दिसले!

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचे नियोजन करताना कसरत करावी लागल्यानंतर पालिकेने मोठय़ा हिमतीने आणि नियोजनबद्ध पद्धतीने स्वतःचेच प्राणवायू पुनर्भरण प्रकल्प उभारले. प्रत्येक संकटाला सामारे जाण्याची मानसिकता असणाऱ्या मुंबईने पुन्हा एकदा ‘स्पिरीट ऑफ मुंबई’ची प्रचीती दाखवली असे गौरवोद्गार आदित्य ठाकरे यांनी काढले. दोन्ही प्रकल्पांची उभारणी वेगाने केल्याबद्दल त्यांनी महापौर, आयुक्त, पालिका प्रशासन, बीपीसीएलचे कौतुक केले.

असा होणार फायदा

ऑक्सिजनची गरज वाढल्याने दुसऱ्या लाटेत दिवसाला 200 डय़ुरा ऑक्सिजन सिलिंडर्सची गरज भासत होती. मात्र आता एकदा महालक्ष्मी प्रकल्पातूनच 100 ते 120 डय़ुरा सिलिंडर्स भरता येणार आहेत. माहुल व महालक्ष्मी अशा दोन्ही प्रकल्पांमधून 186 रुग्णालयांना गरजेनुसार वेगाने ऑक्सिजनचा पुरवठा करणे शक्य होणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.

सिलिंडर्स वाहतुकीसाठी असलेल्या वाहनांमध्ये आवश्यक बदल करून वापर करण्याचे नियोजन केल्यामुळे नव्या वाहनांचा खर्च वाचला आहे. यातून सुमारे दीड कोटी वाचले आहेत. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अवघ्या 3 ते 4 महिन्यांत सर्व परवानग्या मिळवून सिलिंडर बॅटलिंग प्लांट उभारले आहेत. यात माहुलमधील प्लांटसाठी पीबीसीएलचेदेखील सहकार्य मिळाल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.