महामानव

106

धोंडाप्पा नंदे

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान सुधारक. त्यांनी समतेच्या हक्कासाठी आयुष्याचा होम केला. ती समता त्यांनी स्वतःच्या हातांनी हिंदुस्थानी घटनेद्वारे या देशातील प्रत्येक स्त्री-पुरुषाला बहाल केली. सर्वार्थाने ही मोठी भाग्याचीच गोष्ट. शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित-पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र्य, जागतिक अर्थकारण व राजकारण यांविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात. नव्या जगात शिक्षण आणि संघटना ही दोन महत्त्वाची हत्यारे ठरणार आहेत हे त्यांनी जाणले होते. म्हणूनच ‘शिका आणि संघटित व्हा’ असा संदेश त्यांनी हिंदुस्थानी दलित बांधवांना दिला. डॉ. आंबेडकर यांनी या देशासाठी, लोकांसाठी काय केले नाही? मुख्य म्हणजे त्यांनी स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला. ते केवळ दलित बांधवांचेच नव्हे तर हिंदूंचेही उपकारकर्ते ठरले. शिक्षण हे विद्येचे रूप. याच विद्येला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिले दैवत मानले. विद्येशिवाय मानवाला गती नाही, शांतता नाही, सुख नाही हे खरेच. विद्या अंगी बाळगली तरच स्वाभिमानाच्या गर्जना करता येतात. जगण्याला अर्थ प्राप्त होतो. शिक्षणाचीच ही सारी किमया! त्यामुळेच त्याचे महत्त्व डॉ. आंबेडकरांनी अधोरेखित केले. थोर राष्ट्रीय नेते, हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार, दलित मुक्तिलढय़ाचे प्रवर्तक, संशोधक, विचारवंत, पत्रकार, ग्रंथकार अशा नाना आघाडय़ांवर त्यांनी आपल्या आचारविचारांचा अमीट ठसा उमटविला. इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, कायदा इत्यादी ज्ञानक्षेत्रांत विविध विषयांवर प्रचंड लेखन केले. सामाजिक रूढी- अंधश्रद्धेच्या अंधारात चाचपडणाऱया समाजाला जागे करण्याचा अखंड प्रयत्न केला. जागतिक दर्जाची विद्वत्ता, बंडखोरी व क्रांतिकार्य करण्याची प्रवृत्ती, संघटनकौशल्य, शिस्तबद्धता, वक्तृत्व, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, व्यासंग अशा अनेक गुणविशेषांसह त्यांचा प्रवास महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर असा झाला.

आपली प्रतिक्रिया द्या