‘बालगंधर्व’ इमारतीशी संबंध नाही; महामेट्रोचा निर्वाळा

11

सामना प्रतिनिधी । पुणे

महामेट्रोने स्टेशनसाठी बालगंधर्वची जागा मागितली आहे. त्यामुळेच महापालिकेने बालगंधर्व पाडण्याचा घाट घाटला अशी चर्चा सध्या शहरभर सुरू माहे. मात्र, या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नसून बालगंधर्व इमारतीशी महामेट्रोचा कोणताही संबंध नाही. महामेट्रोने बालगंधर्वच्या जागेची कधीही मागणी केलेली नाही, असा निर्वाळा आज महामेट्रोने केला.

महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यासाठी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यात येणार आहे. मात्र, इमारत पाडण्याच्या विरोधात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर विशेष मोहीम राबवित आहेत. त्यातच दोन दिवसांपासून महामेट्रोने बालगंधर्वची जागा मागितली आहे, त्यामुळेच बालगंधर्व पाडण्याचा घाट घातला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

याबाबत महामेट्रोचे प्रकल्पाधिकारी गौतम बिह्राडे म्हणाले, मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आपल्या खासगी वाहनांच्या पार्किंगसाठी जागा उपलब्ध व्हावी, यासाठी बालगंधर्व रंगमंदिरच्या पार्किंगचे इंटिग्रेशनचा प्रस्ताव आहे. या पलीकडे महामेट्रोचा याच्याशी संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या