ट्रेनमध्ये तरुणीची छेड काढली…मोठ्या रकमेसह पोलिसांच्या ताब्यात सापडला…वाचा सविस्तर…

मोठ्या प्रमाणात स्वतःजवळ रोकड ठेवत एक्सप्रेसने प्रवास करणारा प्रवासी पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे. स्वतःजवळ एवढी मोठी रक्कम असतानाही त्याने एका तरुणीची छेड काढली. त्यानंतर मुलीने तक्रार केल्यावर रत्नेश कुमार नावाच्या प्रवाशाला अटक करण्यात आली. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ 58 लाख रुपयांची रोकड आढळल्याने पोलिसही चक्रावले. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रक्कम तो नेत होता काय, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.

दिल्लीहून अलीपूर द्वारकडे जाणाऱ्या महानंदा एक्सप्रेसमधून 58 लाखांची रोकड सोबत घेत रत्नेश कुमार प्रवास करत होता. तो कटिहारला जात होता. एक्सप्रेस पाटणा जंक्शन स्थानकात थांबल्यावर रत्नेश कुमारने एसी कोचमध्ये बसलेल्या तरुणीची छेड काढली. त्या तरुणीने एक व्यक्ती आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार मदत केंद्रावर फोनद्वारे केली.

तरुणीच्या फोनची दखल घेत एक्सप्रेसमध्ये गस्त घालणारे आरपीएफचे जवान एसी कोचमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नेश कुमारला ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी त्याला बख्तियारपूर स्थानकात उतरवण्यात आले. या स्थानकात त्याची आणि त्याच्या बॅगची झडती घेतली असता पोलिसही चक्रावले. रत्नेश कुमारकडे तब्ब्ल 58 लाखांची रोकड सापडली.

एवढी मोठी रोकड सापडल्यावर त्याची कसून चौकशी करण्यात आली. आपण प्रयागराजच्या महुआवा येथील असल्याचे त्याने सांगितले. आपण एक व्यापारी असून कच्चा माल खरेदी करण्यासाठी कटिहारला जात असल्याचे त्याने पोलिसांनी सांगितले. चौकशीनंतर रत्नेशकुमारला पाटणा जंक्शन जीआरपीकडे सोपवण्यात आल्याचे आरपीएफ अधिकाऱ्याने सांगितले.

रत्नेश कुमारकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आढळल्याने आयकर विभागालाही याची माहिती देण्यात आली आहे. आयकर विभागही त्याची चौकशी करत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याने रोकड कोठून आणली आणि ती कुठे नेत होता, याची विभाग चौकशी करत आहे. बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही रत्नेश कुमारची चौकशी करण्यात येत आहे. निवडणुकीसाठी या पैशांचा वापर होणार होता काय, याचा शोध पोलीस घेत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या