महानिर्मिती शेतातील कचरा जाळून वीज निर्मिती करणार, शेतकऱ्यांकडून कचरा खरेदीसाठी टेंडर काढणार

महानिर्मितीच्या औष्णिक वीज केंद्रातून आता शेतातील कचरा (जैव इंधन) जाळून वीज निर्मिती केली जाणार आहे. कोळशावरील वीज प्रकल्पातून वीज निर्मिती करताना यापुढे कोळशासोबत पाच टक्के शेतात उपलब्ध होणारा कचरा जाळावा असे निर्देश केंद्रीय ऊर्जा विभागाने ‘मिशन समर्थ’अंतर्गत दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर पुरेसा कचरा खरेदी करण्यासाठी महानिर्मिती लवकरच टेंडर काढणार आहे.

महानिर्मितीच्या औष्णिक वीज प्रकल्पाची एकूण क्षमता 9 हजार मेगावॅटच्या घरात असून त्यांना पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करण्यासाठी दररोज सुमारे एक लाख मेट्रिक टन कोळसा लागतो. सध्या देशात कोळशाचा तुटवडा असल्याने आणि वीज निर्मितीसाठी कोळसा जाळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. त्यामुळे ऊर्जा विभागाने पर्यायी इंधनाच्या वापरावर भर दिला आहे. त्यानुसार शेतातील पीक काढल्यानंतर शिल्लक राहणाऱया कचऱयाचे गठ्ठे तयार करून वीज निर्मिती करताना ते जाळले जाणार आहेत. त्यामुळे कोळशाची मोठी बचत होणार असल्याची माहिती महानिर्मितीच्या एका वरिष्ठ आधिकाऱयाने दिली.

कोळशाएवढाच उष्मांक
वीज निर्मितीसाठी एक किलो कोळसा जाळल्यानंतर सुमारे 2800-3500 किलो कॅलरी एवढा उष्मांक मिळतो, तर एक किलो शेतातील कोळसा जाळल्यानंतर तेवढाच उष्मांक मिळतो. त्यामुळे वीज निर्मितीच्या खर्चात कपात होऊन ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.