Best of luck – उद्यापासून बारावीची परीक्षा, राज्यात 15 लाख विद्यार्थी परीक्षा देणार

543

शैक्षणिक वाटचालीत दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षा हा महत्त्वाचा टप्पा. उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी बारावीची परीक्षा ही महत्वाची पायरी. ही पायरी पार करण्यासाठी उद्यापासून राज्यात जवळपास 15 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसतील.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता 12 वीची परीक्षा उद्या (18 फेब्रुवारी) पासून सुरू होणार आहे. मुंबई, पुणे, नागपूर, संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या 9 विभागीय मंडळातून जवळपास 15 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. 18 फेब्रुवारी ते 18 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी 9 विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 05 हजार 027 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यात 8 लाख 43 हजार 552 विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार 325 विद्यार्थिनी आहेत.

राज्यात 273 भरारी पथकं
परीक्षा काळातील गैरप्रकारांना आळा घालण्याच्या दृष्टीने मंडळातर्फे राज्यात 273 भरारी पथकं नेमण्यात आली आहे. तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अर्धा तास आधी परीक्षा कक्षात उपस्थित असणं आवश्यक असणार आहे. काही कारणामुळे परीक्षेला उपस्थित न राहू शकलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा 19 आणि 20 मार्चला घेतली जाणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
उच्च शिक्षणात पदार्पण करण्यासाठी बारावीची परीक्षा महत्त्वाची असते. उद्यापासून सुरू होणाऱ्या बारावीची परीक्षा देणाऱ्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या