20 एप्रिलनंतर राज्यातील उद्योग सुरू होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

3242

कोरोनापाठोपाठ ओढवणाऱया आर्थिक संकटाचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील उद्योग 20 एप्रिलनंतर सुरू करण्यात येणार आहेत. केंद्राच्या सूचनांनुसार राज्यातील उद्योग सुरू करण्यासाठी उद्योग विभागाने तयारी सुरू केली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग व आरोग्य विभागाच्या बैठकीत करोनाचा कमी संसर्ग असलेल्या किंवा संसर्ग नसलेल्या भागांत उद्योग सुरू करण्याचा प्रस्तावा तयार करण्याच्या सूचना उद्योग विभागाच्या सचिवांना करण्यात आल्या आहेत.

या बैठकीत सुभाष देसाई यांनी राज्यातील उद्योगांचा आढावा घेतला. उद्योगांना आर्थिकदृष्टय़ा चालना मिळावी, यासाठी केंद्र सरकारने पाठविलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन येत्या 20 तारखेनंतर राज्यातील कोणत्या भागांतील उद्योग सुरू करता येतील, याचा आज आढावा घेऊन एक सूत्र तयार केले असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या भागात कोरोनामुळे प्रतिबंध लागू आहेत अशा ठिकाणी उद्योग सुरू करता येणार नाहीत. इतर ठिकाणी आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून परिस्थितीनुसार 21 तारखेच्या आसपास उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न केला जाईल. याबाबत तयार केलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्याकडे मंजुरीसाठी पाठविला जाईल.

या भागात उद्योग सुरू होणार नाहीत
यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण- डोंबिवली, पनवेल, वसई-विरार, भिवंडी, पुणे- चिंचवड तसेच नागपूर या भागांत उद्योग सुरू करता येणार नसल्याचे उद्योगमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कामगारांची राहण्याची व्यवस्था करावी लागणार
ग्रामीण भागात ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव नाही, अशा ठिकाणी जे उद्योग आपल्या कामागारांना कारखान्याच्या आवारातच राहण्याची व्यवस्था करतील, त्यांना परवानागी दिली जाईल. जे उद्योग नियम पाळतील व वाहतुकीची व्यवस्था करतील त्यांनी देखील सूट दिली जाईल.

कृषी आधारित उद्योगांना प्राधान्य
शेती आधारित उद्योगांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. यामुळे शेतकऱयांना पुढील हंगामांसाठी मदत होईल, असे सुभाष देसाई म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या