पहिल्या प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धेसाठी महाराष्ट्र आर्यनमन हा पहिला संघ जाहीर

येत्या काही दिवसांत सुरू होणाऱ्या पहिल्या प्रीमियर हँडबॉल लीग (पीएचएल) स्पर्धेसाठी पहिल्या मोसमातील पहिला संघ म्हणून महाराष्ट्र आर्यनमन या संघांची घोषणा करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्राला प्रायोजित करणाऱ्या महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा पुनीत बालन स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेचे पुनीत बालन हे या संघाचे मालक आहेत.

प्रतिष्ठित आणि समाजमान्य युवा उद्योजक व समाजसेवक पुनीत बालन हे क्रीडा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उत्साही प्रायोजकांपैकी एक आहेत. अंकिता रैना व ऋतुजा भोसले या युवा टेनिसटूंना आर्थिक साहाय्य करुन त्यांना जगभरात खेळण्याचा अनुभव देण्यासाठी प्रायोजित करण्याचे कार्य बालन यांनी केले आहे.

या संघाची घोषणा करताना पुनीत बालन म्हणाले की, क्रीडा क्षेत्र हे हिंदुस्थानच्या सांस्कृतिक खजिन्याचा एक घटक असून प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे देशातील हँडबॉलच्या प्रसाराला साहाय्य करता येईल, असा विश्वास वाटतो. हँडबॉल हा खेळ ग्रामीण व नागरी परिसरात लोकप्रिय असला, तरी अन्य व्यावसायिक खेळांच्या बरोबरीला हा खेळ आणण्यासाठी आता हीच योग्य वेळ आहे. राज्य व राष्ट्रीय स्तरावरावरील स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने नेहमीच चांगली कामगिरी केली असली, तरी महाराष्ट्र आर्यनमन संघाच्या माध्यमातून विविध स्तरावर गुणवत्ता शोध मोहीम राबवून नव्या गुणवान खेळाडूंना संधी देता येणार आहे. ब्लू स्पोर्ट्स ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून क्रिडा क्षेत्रात कार्यरत असून येत्या जूनमध्ये या लीगचा प्रारंभ होणार आहे. ब्लु स्पोर्टस एंटरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी मनु अग्रवाल यावेळी म्हणाले की, पुनीत बालन यांच्यासारखे उद्योजक एका संघाचे मालक म्हणून या लीगमध्ये सहभागी होत असल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे. हँडबॉल या खेळाला देशभरात नवी ओळख मिळवून देण्यासाठी ते आमच्यासोबत आहेत.

प्रीमियर हँडबॉल लीग स्पर्धेच्या उद्घाटनाच्या मौसमाचा प्रारंभ 8 जून 2023रोजी होणार असून 25 जूनपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. व्हायकॉम 18नेटवर्क (जिओ सिनेमा), स्पोर्टस 18-1(एचडी आणि एसडी) तसेच स्पोर्टस 18 खेल या वाहिन्यांवरून स्पर्धेतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.