चला, विजयाचे तोरण बांधूया! महायुतीची आज बीकेसी येथे महासभा

693
फाईल फोटो

शिवसेना-भाजप महायुतीच्या प्रचार सभांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात भगवा झंझावात उठला आहे. सभा, प्रचार फेऱया, मतदारांशी प्रत्यक्ष भेटीगाठी अशा माध्यमातून महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. आता महायुतीची महासभा उद्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथे होणार आहे. या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावरून महायुतीच्या विजयाचा शंखनाद करणार आहेत. महायुतीचे लाखो कार्यकर्ते ‘चलो बीकेसी’चा नारा देत जणू उद्या विजयाचे तोरणच बांधणार आहेत.

वांद्रे पूर्व येथील बीकेसी मैदानावर सायंकाळी 6 वाजता ही महासभा आयोजित करण्यात आली आहे. महायुतीमधील घटक पक्षांचे नेते रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे, रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्यासह महायुतीमधील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे उद्याच्या अभूतपूर्व सभेकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

  • महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते, युवासेना प्रमुख
    आदित्य ठाकरे यांनी आतापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत अनेक सभा घेतल्या आहेत.
  • प्रत्येक सभेला हजारोंची गर्दी झाली होती.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याही जोरदार प्रचार सभा झाल्या.
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा प्रचार सभांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडून महायुतीला पुन्हा एकदा कौल द्या, असे आवाहन केले.
  • आता उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस हे नेते उद्या महायुतीच्या महासभेत एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या