केंद्राचे दोन विशेष निरीक्षक महाराष्ट्रात, पैसे, दारू वाटपावर वॉच

265

राज्यातील विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाच्या मर्यादेवर व पैशाच्या उधळपट्टीवर खास लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन विशेष निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. या दोन्ही निरीक्षकांनी लोकसभा निवडणुकीत तामीळनाडू व कर्नाटकमधील लोकसभा निवडणुकीत उमेदवाराच्या खर्चावर वॉच ठेवण्याची जबाबदारी पार पाडली होती. आता महाराष्ट्रातील निवडणूक खर्चावर नजर ठेवणार आहेत.

विधानसभा निवडणुकीतील खर्चाची मर्यादा सध्या 28 लाख रुपये आहे. सध्याच्या महागाईच्या दिवसांत निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी केली आहे. विधानसभा निवडणूक जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व त्यांचे पथक मुंबई आले होते. त्यावेळी ‘सह्याद्री’ अतिथीगृहावर राजकीय पक्षांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक पथकाची भेट घेऊन खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती, पण खर्चाची मर्यादा वाढवणे शक्य नसल्याचे सुनील अरोरा यांनी यावेळी स्पष्ट केले होते.

निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याऐवजी राज्यातल्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महसूल सेवेतील दोन माजी विशेष अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे. 1982 च्या महसूल सेवेतील निवृत्त माजी अधिकारी मधू महाजन व महसूल सेवेतील 1983 च्या बॅचचे माजी अधिकारी बी. मुरली कुमार यांची विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या धनशक्तीवर नजर ठेवण्याचे काम हे दोन विशेष निरीक्षक करणार आहेत. श्रीमती महाजन यांचा मुक्काम मुंबईत राहील तर बी. मुरली कुमार यांचा मुक्काम पुण्यात राहील. राज्यातल्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खर्चावर या निरीक्षकांची नजर राहील.

आयकर खात्याचा अनुभव
मधू महाजन यांचा आयकर खात्यातील तपासाचा प्रदीर्घ अनुभव आहे. लोकसभा निवडणुकीत निवडणूक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी महाजन यांची तामीळनाडू व कर्नाटकमध्ये विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती, तर बी. मुरली कुमार यांची लोकसभा निवडणुकीत चेन्नईमध्ये विशेष निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

बँकांच्या व्यवहारावर लक्ष
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात दारू, रोख रक्कम व बँकेमधून होणाऱया मोठय़ा रकमांच्या व्यवहारावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय इन्कम टॅक्स व उत्पादन शुल्क विभागाची भरारी पथके कार्यरत राहणार आहेत. राज्यातील निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर या विशेष निरीक्षकांची देखरेख राहील. त्याशिवाय ‘सी व्हिजील’ ऍप व निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत तक्रार करण्यासाठी सुरू केलेल्या 1950 या हेल्पलाइनवर आलेल्या तक्रारींवर खासकरून पैशाच्या वाटपावर या निरीक्षकांची विशेष नजर राहाणार आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणावर सहकारी बँकांचा मोठा प्रभाव आहे. सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या हातात सहकार बँकांमधील अर्थकारण आहे. त्यामुळे सहकारी बँकांमधील व्यवहारावर या दोन विशेष निरीक्षकांची खास नजर राहील असे सांगण्यात येते.

आपली प्रतिक्रिया द्या