महायुतीसाठी गोरेगावची लढाई सोपी, पण चुरस वाढली

1029

एकेकाळी राजकीयदृष्टय़ा प्रगल्भ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोरेगावची काँग्रेसमुक्त विधानसभा अशीच ओळख मागील काही वर्षापासून झाली आहे. सुरुवातीला समाजवादी पक्ष, शिवसेना आणि आता भाजप आमदार या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. या भागातील शिवसेना-भाजपची ताकद पाहता महायुतीसाठी गोरेगावची लढाई सोपी आहे. मात्र राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या विरोधात काँग्रेसने प्रथमच पत्रकार युवराज मोहीते यांच्यासारखा एक स्थानिक मराठी चेहरा निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

सुरुवातीच्या काळात ज्येष्ठ समाजवादी नेते प. बा. सामंत, माजी विरोधीपक्ष नेत्या मृणाल गोरे यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले. पण राजकीयदृष्टया मतदारसंघाची बांधणी त्यांना करता आली नाही. परिणामी मराठी, उत्तर भारतीय, गुजराथी, मारवाडी समाज, दलित, मुस्लीम अशी संमीश्र वस्ती असलेल्या या भागात हिंदुत्वाच्या मुद्यावर समाजकारण आणि राजकारण करणाऱ्या शिवसेना-भाजपची मुळे खोलवर रुजविण्यात युतीच्या नेत्यांना यश आले. जवळपास वीस वर्षे गोरेगाव विधानसभा युतीच्या ताब्यात आहे. त्यामुळे महायुतीसाठी ही लढाई फारशी कठीण नसली तरी काँग्रेसच्या राजकारणातील नवख्या उमेदवाराला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

स्थानिक मराठी चेहरा असणारे व समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्यासोबत अनेक वर्षे सामाजिक चळवळीत हिरहिरीने काम करणाऱ्या पत्रकार युवराज मोहीते यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. विभागातील समस्यांची जाण असलेला आणि अभ्यासू चेहरा म्हणून विविध सामाजिक संस्था तसेच सुशिक्षित मतदारांचा मोहीते यांना पाठींबा मिळत आहे. गोरेगाव पुर्वेकडील मराठी बहुल वस्तीतील लोकांना ते आपलेसे वाटत असून काँग्रेसबरोबरच समाजवादी चळवळीतील कार्यकर्ते त्यांना निवडून आणण्यासाठी जोमाने काम करताना दिसत आहेत. एकेकाळी राजकीय पत्रकारीता करणाऱ्या मोहीते यांनी मतदारसंघातील समस्यांवर लक्ष केंद्रीत करत ठाकुर यांना अडचणीत आणण्याची रणणिती आखली आहे.

राज्यमंत्री असतानाही विद्या ठाकूर यांना मतदारसंघातील समस्या सोडविता आल्या नाहीत, असे आरोप विरोधकांकडून होत आहेत. दुसरीकडे मेट्रोचे काम, गोरेगाववरून हार्बरमार्गे थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी लोकलसेवा, गोरेगाव ते चर्चगेट अशी थेट लोकलसेवा अशी कामे त्यांच्या कार्यकाळात झाली ही त्याच्यादृष्टीने जमेची बाजू आहे. राज्यमंत्री पदापेक्षा ठाकूर यांचा गोरेगावमध्ये असलेला दांडगा जनसंपर्क तसेच नगरसेवक मुलगा आणि पति जयप्रकाश ठाकूर यांची कार्यपद्धती यामुळे विद्या ठाकूर यांच्याबाबत मतदारांत आणि पक्षांतर्गत कितीही नाराजी असली तरी काँग्रेस उमेदवारावर सहज मात करतील, अशी भाजप नेत्यांना आशा आहे.

मतदारसंघातील समस्या

  • मोतीलालनगरचा रखडलेला पुनर्विकास
  • सिध्दार्थनगरमधील झोपडपट्टी पुनर्वसनाला गती नाही
  • सिद्धार्थनगर रुग्णालय दुरुस्तीच्या नावाखाली बंद
  • गोरेगाव पूर्व आणि पश्चिमेची वाहतूक कोंडी
  • म्हाडा कॉलनी, सिद्धार्थनगर परिसरात पावसाचे साचणारे पाणी
  • रखडलेल्या पुनर्विकासामुळे सातशेहून अधिक कुटुंबे बेघर
  • फुटपाथवरील फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण
आपली प्रतिक्रिया द्या