शिवसेनेचा सत्तास्थापनेचा दावा; मात्र राज्यपालांचा वेळ वाढवून देण्यास नकार

2095

राज्यपालांनी शिवसेनेला संख्याबळ दाखवण्यासाठी वाढीव वेळ नाकारली असली तरी सत्तास्थापनेचा दावा नाकारलेला नाही, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपालांना देण्यात आले असून इतर पक्षांच्या पाठिंब्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी आम्ही राज्यपालांकडे 48 तासांची वेळ मागितली. मात्र राज्यपालांनी वाढीव वेळ देण्यास नकार दिला. अर्थात त्यांनी वेळ नाकारलेली असली तरी आमचा सत्तास्थापनेचा दावा नाकारलेला नाही. त्यामुळे सत्तास्थापनेची सर्व प्रक्रिया लवकरच पूर्ण करू, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

महाराष्ट्रात स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही पुढे आलेलो आहोत. ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. राष्ट्रपती राजवट लागेल किंवा काहीही असेल; पण शिवसेनेचा दावा कायम राहणार आहे. शिवसेना सर्वांना पुढे घेऊन जाईल. स्थिर सरकार देणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही पार पाडू, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. या शिष्टमंडळात विधिमंडळ गटनेते, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, खासदार विनायक राऊत यांचा समावेश होता.

आपली प्रतिक्रिया द्या