कुकडीचे पाणी देता येणार नाही! अजित पवारांच्या पत्राच्या प्रती व्हायरल

1431
ajit-pawar-tension

#MahaElection 2019 कुकडीच्या पाण्यावरून गेल्या अनेक वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये संघर्ष उभा ठाकला असतानाच कुकडीचे पाणी नगर जिल्हयाला देता येणार नाही असे 2001 सालचे पत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हारयल झाल्यामुळे निवडणुकीच्या काळातच या पत्राची चर्चा कर्जत-जामखेड मतदार संघात चांगलीच जोर धरू लागली आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राम शिंदे, विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यात लढत होत आहे. 18 वर्षापूर्वी 28 नोव्हेंबर 2001 रोजी अजित पवार यांनी तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांना पत्र पाठवून ‘कुकडी प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या वापराच्या पाण्याचे पूर्ण नियोजन झाले असल्याने जामखेड तालुक्याला पाणी देता येत नाही’, असे लेखी पत्र देऊन, जामखेड तालुक्याला कुकडीचे पाणी देण्यास अजित पवारांनी उघड विरोध केला होता. सध्या ते पत्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. जामखेडला पाणी देता येणार नाही, असे पत्र दिल्यानंतरही जामखेडच्या शेतकर्‍यांनी ज्या-ज्या वेळी कुकडीचे पाणी मागितले त्या-त्या वेळी व राष्ट्रवादीचा आमदार निवडून द्या, कुकडीचे पाणी देतो, राष्ट्रवादीचा खासदार निवडून द्या, कुकडीचे पाणी देतो, जि.प.,पं.स. उमेदवार निवडून द्या कुकडीचे पाणी देतो, अशा अटी-शर्ती अजित पवारांनी जामखेडच्या जनतेला घालत मते मिळविण्याचा प्रयत्न केला. निव्वळ जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते करत आहेत.

कर्जतचा उत्तरेकडील उर्वरित भाग सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील जवळा आणि आगी या सीना नदीवर दोन कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात केला. या माध्यमातून येत्या काळात जवळा, आगी, मतेवाडी, दिघी (ता.कर्जत), खडकी (ता.करमाळा) येथील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ही वस्तुस्थिती असताना कर्जत-जामखेडला कुकडीचे हक्काचे पाणी मिळवून देण्याची भाषा रोहित पवार कोणत्या तोंडाने करत आहेत असा सवाल शिंदे यांनी उपस्थित करून राजकारणाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

कर्जत आणि जामखेड आजपर्यंत हक्काच्या पाण्यावाचून वंचित ठेवायला हेच आणि आज निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करण्याचे कामही हेच पिता पुत्र करत आहेत असा आरोप शिंदे समर्थकांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन केला आहे. भाजप सरकारला हे शक्य झाले, अजित पवारांना का शक्य झाले नाही? तर कर्जत-जामखेड तालुक्यांना कुकडीचे पाणी देण्याची पवारांची मानसिकताच नव्हती. त्यामुळे रोहित पवारांना कर्जत-जामखेडच्या पाणीप्रश्रावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असे सोशल मेसेज मीडियवर सुरू झाले आहे.

अजित पवारांनी कुकडीचे पाणी जामखेडला देता येणार नाही, असे लेखी पत्र सन 2001 साली दिल्यानंतर सध्याच्या सरकारमध्ये पालकमंत्री राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी आता त्याची विचारणा केली आहे. पाणी कसे देणार आणि कोण देणार यावर आता सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या