विधानसभा निवडणूक २०१९ – ‘या’ पाच अटीतटीच्या लढतींच्या निकालावर राज्याची नजर

6846

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. प्रत्येक मतदारसंघातील उमेदवाराच्या हृदयाची धडधड वाढली आहे. राज्यात एकूण 288 मतदारसंघात 3239 उमेदवार रिंगणात उतरले होते. राज्यात 60 टक्के मतदान झाले असून सर्व उमेदवारांचे भविष्य ईव्हीएममध्ये कैद झाले आहे. आता सर्वांना निकालाची उत्सुकता असून एक्झिट पोलनुसार महाराष्ट्राचा कल पुन्हा एकदा महायुतीकडे झुकल्याचे दिसत आहे. परंतु राज्यातील काही मतदारसंघात अटीतटीच्या लढती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पाहूया कोणते आहेत हे मतदारसंघ –

परळीत बहिण-भावाची लढत

pankaja-munde-dhananjay-mun
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विरुद्ध महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्यात सामना होत आहे. मतदानाच्या अखेरच्या दिवशी धनंजय मुंडे यांचा व्हायरल झालेला व्हिडीओ, भाषणानंतर कोसळलेल्या पंकजा मुंडे, त्यानंतर दोघांचीही भावूक साद घालणारी पत्रकार परिषद यामुळे मतदारसंघातील चूरस वाढल्याचे दिसले. परळी विधानसभा मतदारसंघात 3 लाख 6 हजार 204 एवाढे मतदान आहे. 1 लाख 19 हजार 541 पुरूषांनी, 1 लाख 3 हजार 749 स्त्रियांनी असे एकूण 2 लाख 23 हजार 300 मतदारांनी 72.93 च्या सरासरीने मतदान केले. त्यामुळे उद्या या सर्वांनी कोणाची निवड केली आहे हे स्पष्ट होईल.

कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदेंविरुद्द रोहित पवार

karjat
नगर जिल्ह्यातील सर्वात हायव्होल्टेज लढत कर्जत-जामखेड मतदारसंघात होत आहे. येथे 1995 पासून भाजपचे वर्चस्व असून पालकमंत्री राम शिंदे हे विद्यमान आमदार आहे. यंदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांनी राम शिंदेंपुढे आव्हान उभे केले असून शरद पवार व मुख्यमंत्री फडणवीस यांनी जातीने येथे लक्ष घातल्याने निकालाकडे सर्वांची नजर असणार आहे. कर्जत-जामखेडमध्ये भाजप गड राखणार की राष्ट्रवादी काँग्रेस सुरुंग लावणारे हे उद्या स्पष्ट होईल. या मतदारसंघात एकूण 60.76 टक्के मतदान झाले असून जातीची समिकरणं महत्त्वाची ठरणार आहेत.

कोथरूडमध्ये पाटील की शिंदे?

kothrud
पुण्यातील कोथरूड मतदारसंघात भाजपने विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिली. यामुळे मोठा गदारोळ झाला होता. चंद्रकात पाटील यांना ब्राह्मण महासंघाने विरोध केला, परंतु शेवटच्या टप्प्यात हा विरोध मावळल्याचे दिसले. या मतदारसंघात पाटील यांच्यासमोर मनसेचे किशोर शिंदे यांचे आव्हान आहे. शिंदे यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याने हा मतदारसंघ आणखी रंगात आला. मतदानापूर्वी चंद्रकांत पाटील यांच्या नावाची मस्करी झाली. परंतु भाजपने या मतदारसंघात चांगलाच जोर लावल्याचे दिसून आले. येथे एकूण 43.23 टक्के मतदान झाले असून उद्याच्या निकालावर सर्वांची नजर असणार आहे.

कणकवलीत कोण मारणार बाजी?

kankavli
रत्नागिरी जिल्ह्यातील कणकवली मतदारसंघात भाजपचे नितेश राणे आणि शिवसेनेचे सतिश सावंत अशी थेट लढत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुती असतानाही भाजपने या मतदारसंघात आपला उमेदवार दिल्याने चूरस वाढली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे झंझावाती सभा घेत ‘असा शत्रू मित्रपक्षातही नको’ अशी भूमिका घेत इशारा दिला होता. तसेच मतदानापूर्वी भाजपचा पारंपारिक मतदार ब्राह्मण समाजाने नितेश राणे यांनी मराठा-ब्राह्मण यांच्या द्वेष वाढवल्याचे म्हणत त्यांना मतदान न करण्याचे आवाहन केले होते. या मतदारसंघातून एकूण 25 ते 30 हजार ब्राह्मण मतदार आहेत. त्यामुळे याचा थेट प्रभाव निकालावर पडण्याची शक्यता आहे. येथे एकूण 61.41 टक्के मतदान झाले असून कोण बाजी मारणार याकडे लक्ष आहे.

सातारा ‘राजेंचा’ की ‘पाटलांचा’?

satara
विधानसभा निवडणुकीसह साताऱ्यात लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान पार पडले. साताऱ्यात छत्रपती उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आणि भाजपच्या तिकीटावर ते रिंगणात उतरले. उदयनराजे यांच्यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीनिवास पाटील यांचे आव्हान आहे. पाटील हे दोनवेळा खासदार राहिले असून सिक्कीमचे राज्यपालही होते. त्यांच्यासाठी खास शरद पवार यांनी पावसात सभा घेत लोकांची मनं जिंकली होती. परंतु सातारा राजेंचा की पाटलांचा हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.

आपली प्रतिक्रिया द्या