सरकार पाडण्याचे ते दिवस विसरा; उद्धव ठाकरेंचा पवारांना सणसणीत टोला

2449
uddhav-thackrey-nagar-3
फाईल फोटो

#MahaElection 2019 विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता चांगलाच रंगला असून शिवसेना-भाजप महायुतीच्या सभा जोरदार पार पडत आहेत. विरोधकांनी देखील कंबर कसली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. जालना येथे आज झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे सरकारच राहणार असा विश्वास व्यक्त केला. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार घालवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे विधान सभेत केले होते. या विधानाचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवार यांनी वसंतदादांचे सरकार पाडले होते. त्यांचा सरकार पाडण्याचा, घालवण्याचा अनुभव दांडगा आहे. ते दिवस विसरा आता, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. आता ही निवडणूक जनतेनेच आपल्या हातात घेतली आहे. त्यामुळे पवारांचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे ही ते म्हणाले.

निवडणुकांचा सामने सुरू झाले आहेत. कमी ओव्हरमध्ये जास्त रन काढायचे आहेत, असेही ते म्हणाले. सरकार आल्यानंतर 1 रुपयात संपूर्ण वैद्यकीय चाचण्या, 10 रुपयात जेवण आम्ही देणार आहोत, असे त्यांनी पुन्हा एकदा जाहीर सभेत सांगितले. तसेच जे बोलेन ते करून दाखवणार, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना फक्त कर्जमुक्ती नाही तर चिंतामुक्तही करणार असल्याचे ते म्हणाले.

युतीच्या उमेदवाराला निवडून देणार का?

सभेत बोलताना ते म्हणाले की तुम्ही युतीच्या उमेदवाराला निवडून देणार का? असा प्रश्न विचारताच संपूर्ण सभेने उभे राहून त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी शिवसेना झिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणांनी सभास्थळ दणाणून सोडले.

शिवसैनिकांची माफी मागण्यात काही गैर वाटत नाही

युतीत काही कमवलं जातं, तर काही गमावलं जातं. ही युतीचा निर्णय घेताना काही जागा सुटतात. त्यामुळे अनेकजण दुखावले जातात. पण शिवसैनिकांनी मनाचा मोठेपणा दाखवला. युती करताना तुझं-माझं खेचत बसायचं हे योग्य नाही, म्हणून जे सुटले त्यांची माफी मागतो. शिवसैनिकांची माफी मागण्यात काही गैर वाटत नाही. एक जूना अनुभव सांगत ते म्हणाले की पत्रकारांनी एकदा छापले होते की, उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोर गुडघे टेकले. पण दुसऱ्या दिवशी मी जाहीर सभेत सांगितले की, हा माझा शिवसैनिक आहे, हीच माझ्या आयुष्यातील कमाई आहे. शिवसैनिकांसमोर गुडघेच काय तर माथाही टेकेन, असे त्यांनी म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला, घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला.

आपली प्रतिक्रिया द्या