शिवसेनेच्या वचननाम्यात एकही प्रिंटिंग मिस्टेक नाही! उद्धव ठाकरे

1132

शिवसेनेच्या वचननाम्यात एकही प्रिंटिंग मिस्टेक नाही. प्रत्येक वचनाच्या काना, मात्रा, वेलांटीला मी जबाबदार आहे. अनेकजण म्हणतात, 10 रुपयांच्या थाळीने तिजोरीवर भार पडेल. अरे, तो पडतोच आहे ना! पण तिजोरीवरचा भार लुच्चेलफंगे खाऊन जाण्यापेक्षा त्या पैशातून मला जिवाभावाच्या जनतेचे पोट भरू द्या, त्यांना सुदृढ करू द्या… या निवडणुकीतल्या थापा नाहीत. हे माझे वचन आहे; कारण मला सुखी, संपन्न आणि सुदृढ महाराष्ट्र घडवायचा आहे, असे जबरदस्त ठाकरी फटकारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावले. दहा रुपयांत जेवण आणि एक रुपयात आरोग्य सेवेच्या वचनाची पोटदुखी झालेल्यांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.

पालघरचे उमेदवार चिंतामण वनगा, बोईसरमधील उमेदवार विलास तरे, वसईचे विजय पाटील, नालासोपाऱयाचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि ठाण्यातील उमेदवार एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांच्या आज झंझावाती सभा झाल्या. तीनही सभा प्रचंड गर्दीच्या ओव्हरपॅक अशाच झाल्या. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी दहा रुपयांत जेवण आणि एक रुपयात आरोग्य सेवेच्या शिवसेनेच्या वचनाची पोटदुखी झालेल्यांचा उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला.

पालघरमधून एक खासदार नेला… आता सगळे आमदार नेऊ

सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत पालघरमधून तुम्ही तुमच्या हक्काचा आमदार निवडून दिलात, यासाठी तुम्हाला दंडवत घालतो असे सांगितले. गेल्यावेळी पालघरमधून आम्ही एक खासदार नेला, यावेळी जिह्यातले सगळे आमदार घेऊन जाऊ, असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला तेव्हा ‘शिवसेना झिंदाबाद’च्या गगनभेदी घोषणा घुमल्या. ते पुढे म्हणाले, जीवदानी मातेला मी साकडे घातले की माते मला आशीर्वाद दे आणि सगळीकडे भगवा फडकव. जिंकल्यानंतर सर्व भगव्या आमदारांना घेऊन मी तुझ्या दर्शनासाठी येईन.

पाठिंबा द्यायचा आणि खुर्चीचे पाय कापायचे हे धंदे आम्ही केले नाहीत

सत्तेची लालसा निर्माण झाली की पक्ष कसा संपतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेस. स्वातंत्र्यपूर्व काळात भाजप आणि शिवसेना नव्हती. काँग्रेस होती. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस फक्त सत्तेच्या मागे लागली. त्यामुळे ती रसातळाला गेली. विचार संपला आणि काँग्रेस संपली याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली. ते पुढे म्हणाले, शरद पवारांच्या अदृश्य पाठिंब्याने भाजपचे सरकार अस्थिर झाले असते. ते होऊ नये म्हणून शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला तोही मोकळेपणाने आणि विरोध केला तोही उघडउघड. पाठिंबा द्यायचा आणि पाठीमागून खुर्चीचे पाय कापायचे हे असले धंदे मी कधी केले नाहीत आणि करणारही नाही; कारण ते माझ्या रक्तात नाही. मैत्री केली आणि करेन ती दिलखुलासपणाने… जशी आज केली आहे. उद्या सरकार येऊन एखादी गोष्ट पटली नाही तरीही मी बोलेन. कारण सत्तेसाठी मी लाचार नाही. शिवसैनिकांच्या माध्यमातून मी पुन्हा सत्ता आणीन, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

तेव्हा तुमचा काका का बोंबलला नाही?

अयोध्या प्रकरणानंतर भडकलेल्या दंगलीत ज्या शिवसैनिकांनी मुंबई वाचवली त्या शिवसैनिकांच्या पुढच्या पिढय़ा आता शिवसेनेत काम करताहेत; पण तेव्हा तर गुन्हा ठरवला गेला. शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा शरद पवारांपासून सगळे मूग गिळून गप्प  बसले होते. आता अजित पवारांना कंठ फुटलाय. म्हणे ती तेव्हा राष्ट्रवादीची चूक होती. ही चूक होती तर तुमचा काका तेव्हा का बोंबलला नाही, असा जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

नाणार गेले… वाढवणही घालवू

मनोर येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी स्थानिक भूमिपुत्र आणि मच्छीमारांना उध्वस्त होऊ देणार नाही असा दिलासा दिला. ते म्हणाले,  नाणार घालवले तसाच वाढवण बंदराला स्थानिक जनतेचा विरोध असेल तर शिवसेना हे बंदर होऊ देणार नाही. नाणारप्रमाणे वाढवणही घालवू. पर्ससीन नेटच्या मासेमारीमुळे मच्छीमार उध्वस्त होत असतील तर त्याचाही सोक्षमोक्ष लावून दाखवू आणि त्यांच्या डिझेलचा परतावा पूर्ण करू, असे वचन त्यांनी दिले. श्रीनिवास वनगा यांना लोकसभा निवडणुकीत शब्द दिला होता, तो शब्दही पूर्ण केला आहे. शिवसेना जे वचन देते ते पूर्ण करतेच.  यावेळी शिवसेना नेते, पालकमंत्री व कोपरी-पाचपाखाडीचे उमेदवार एकनाथ शिंदे यांनी विकासकामांच्या बळावर ठाणे, पालघरमधील सर्व 24 जागा शिवसेना-भाजप महायुती जिंकेल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी उपनेते अनंत तरे, खासदार राजन विचारे, राजेंद्र गावीत, डॉ. श्रीकांत शिंदे, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रवींद्र फाटक, शिवसेना महायुतीचे उमेदवार प्रताप सरनाईक, संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के, पालघर जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण, राजेश शहा, कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष ईश्वर धुळे, सुरेश जाधव, महिला    आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, कोकण विकास पाटबंधारे महामंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, आगरी सेनेचे चंदुलाल घरत,        महिला जिल्हा संघटक ज्योती मेहेर, लोकसभा समन्वयक प्रभाकर राऊळ, आगरी सेनेचे जनार्दन पाटील, भाजपचे जिल्हा सचिव राजन पाटील, माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, उपजिल्हाप्रमुख निलेश तेंडोलकर, उपशहरप्रमुख उदय जाधव, विधानसभा उपसंघटक महेश धामणस्कर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे ही शिवसेनेची ‘भगवी इस्टेट’

ठाण्यातील वागळे इस्टेट येथील सभेत उद्धव ठाकरे यांनी शहरातील विकासकामांचे कौतुक केले. ते म्हणाले, महाराष्ट्रभर प्रचार करतोय, पण ठाण्यात काय बोलावं हेच कळत नाही. कारण इथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी विकासकामे करून ठेवली आहेत. ठाणे ही शिवसेनेची भगवी इस्टेट आहे. प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत ठाणेकर शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

गुंडांची दहशत आम्ही चिरडतो हा शिवसेनेचा इतिहास आहे

वसई-विरारमधील गुंडगिरी संपवा असे निवेदन स्थानिक जनतेने दिले आहे. त्याचा संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले,  काल कोकणात गेलो होतो. त्या कोकणात दहशत होती. ती दहशतही शिवसेनेने चिरडून टाकली. जिथे जिथे शिवसेना जाते तिथे तिथे गुंडांची दहशत आम्ही चिरडून टाकतोच हा शिवसेनेचा इतिहास आहे. एक तर आम्ही गुंडगिरी करत नाही. कोणावर उगाच वारही करत नाही; पण कोण अंगावर आला तर आम्ही त्याला सोडत नाही… अजिबात सोडत नाही… असा जबरदस्त घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. वसई-विरार दहशतमुक्त करायची आहे. पण ढेकणं चिरडायला तोफ कशाला? तो तर अंगठय़ाने चिरडायचा असतो (प्रचंड टाळय़ा आणि घोषणा). आतापर्यंत तुम्ही दहशतीच्या वातावरणात जगत होतात. पर्याय शोधत होतात, तो कणखर पर्याय प्रदीप शर्मा आणि विजय पाटील या उमेदवारांच्या रूपाने मी तुम्हाला दिला आहे. ज्यांनी तुमच्या जीवनाचा नरक बनवलाय ते आता पुन्हा तुमच्याकडे येतील, मत दिले नाही तर पाणी, वीज तोडू अशा धमक्या देतील. पण हिंमत असेल तर तोडून दाखवाच. गाठ शिवसेनेशी आहे. आरे ला का रे करण्यासाठी पैदा झालेला शिवसैनिक तुमची गुंडगिरी मोडून, तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, असे वचनच उद्धव ठाकरे यांनी दिले.  दसरा झाला… दिवाळी आली… आता जीवदानी महिषासुरमर्दिनीच्या साक्षीने नरकासुराला गाडायचे आहे. वाट कसली बघताय? आता तुमची दहशत दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले तेव्हा प्रचंड जनसमुदायाने वज्रनिर्धाराच्या मुठी उंचावल्या.

मतपेटीतून काळोख बाहेर काढायचा की उजेड… तुम्ही ठरवा

शिवसेनेने दिलेला वचननामा पूर्ण करण्याची शपथ उद्धव ठाकरे यांनी या सभेत घेतली. ते म्हणाले, सर्वसामान्य जनतेची सुरक्षा, चांगले आरोग्य, सुखकर जीवन, तरुणांना रोजगार देण्याचं काम आम्ही करणार आहोत. त्याआधीचं काम तुम्हाला करायचं आहे. दोन दिवसांत तुमच्या सर्वांचं मतदान यंत्रात बंद होईल. त्यात तुमचं भाग्य बंद होईल. तुमचा भविष्यकाळ यंत्रात बंद होईल. या मतपेटीतून उजेड बाहेर काढायचा की काळोख हे तुम्हाला ठरवायचं आहे.

नालासोपारा येथील महायुतीचे उमेदवार प्रदीप शर्मा आणि वसईचे उमेदवार विजय पाटील यांच्या प्रचारासाठी मनवेलपाडा येथे झालेल्या प्रचार सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या