सत्तेत राहून जनतेचा आवाज बुलंद ठेवणारच! उद्धव ठाकरे यांचा निर्धार

751
Uddhav Thackeray Sadabhau Khot Islampur Rally

गेली पाच वर्षे सत्तेत राहून शिवसेनेने सामान्य जनतेचा आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद ठेवला. शिवसेनेने जे मुद्दे उचलले ते सर्वसामान्य जनतेचे होते. राज्यात महायुतीचे सरकार येणारच आहे. तेव्हा उद्याही जनतेसोबत राहून शेतकऱ्यांचे प्रश्न उचलणार! असा वज्रनिर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आमच्यात वाद नव्हते. काही मतभेद होते, ते गाडून महाराष्ट्राच्या जनतेच्या हितासाठी महायुती करून एकत्र आलो आहोत. पाच वर्षे सत्तेत असताना सरकारमध्ये कधीही दगाफटका केला नाही किंवा सरकार हलत-डुलत ठेवण्याचे फालतू धंदे केले नाहीत. म्हणून महाराष्ट्रात जी कामे झाली त्यात शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे याचा अभिमान वाटतो, असे विरोधकांना सुनावले.

नगर, धाराशीव, सोलापूर जिह्यांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभांचा झंझावात कोल्हापूर आणि सांगली जिह्यात झाला. शिवसेना-भाजप महायुतीचे सांगली जिह्यातील ईश्वरपूर येथील उमेदवार गौरव नायकवडी, शिरोळ येथील उमेदवार आमदार उल्हास पाटील, हातकणंगलेचे उमेदवार आमदार डॉ. सुजित मिणचेकर, चंदगडचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर, शाहूवाडी-पन्हाळाचे उमेदवार आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, कोल्हापूर उत्तरचे उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दणदणीत सभा झाल्या. उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी भगवा जनसागर उसळला होता.

महापुराच्या काळात मी सांगली, कोल्हापूरला येण्यास निघालो. मात्र, स्वतःची तब्येत बरी नसल्याने दुर्दैवाने मला येता आले नाही. याबद्दल सभेच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांनी दिलगिरी व्यक्त केली.सध्या विरोधकांत रात्र थोडी आणि सोंगे फार असे झाले आहे. पण, आम्ही सोंगाढोंगावाले लोक नाहीत, असा टोला विरोधकांना लगावून उद्धव ठाकरे म्हणाले, विरोधकांना विचारा, महापुरावेळी जेव्हा आम्ही बुडत होतो, तेव्हा तुम्ही कुठे होता? कशाला उगाच तंगडय़ात तंगडय़ा घालतायं? निवडणुकीनंतर महायुतीचे सरकार येणार आहे. सामान्य माणूस ही शिवसेनेची परंपरा आहे. सामान्य माणूस असामान्य कर्तृत्व दाखवतो, ही शिवसेनेची ओळख आहे. पाच वर्षे सत्तेत असूनही शिवसेनेने सामान्य माणूस, सामान्य जनता आणि शेतकऱ्यांचा आवाज सरकारमध्ये बुलंद ठेवला. या निवडणुकीनंतर आपलीच सत्ता येणार आहे. तेव्हादेखील शिवसेनेचा आवाज जनतेसाठी बुलंद राहणारच, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मी ज्या गोष्टी सांगतो, बोलतो त्या पूर्ण करण्याची वचनबद्धता माझ्याकडे आहे. मी कधी पाठीत वार करीत नाही. समोरून कोणी आला तर वाघनखं तयार असतात, असेही त्यांनी बजावले.

राम मंदिराचा निकाल लागेल आणि राम मंदिर होईल, अशी ग्वाही देऊन उद्धव ठाकरे म्हणाले, राम मंदिर होणारच आहे. पण, राम मंदिरासाठी हात पुढे आले, त्या हातांना रोजगार दिला पाहिजे. भावना भडकावून त्यावर पोळ्या भाजण्याचे धंदे मला जमत नाहीत. म्हणून तुमचं भवितव्य घडवण्यासाठी आम्ही महायुती करून मत मागत आहोत. गेल्या पाच वर्षांत केलेली सेवा तुम्हाला मंजूर असेल तर हात उंच करून पाठिंबा द्या, असे आवाहन जनसमुदायाला करताच, हजारो हात उंचावले आणि शिवसेनेचा जयजयकार दुमदुमला.

महायुतीला विजयी करून एक नवा इतिहास घडवण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. हा इतिहास आपण घडवणार असा वज्रनिर्धारही त्यांनी या वेळी केला. चार-सहा दिवसांवर निवडणुका आल्या आहेत. काय फटके मारायचे ते मारतो आहे. घडय़ाळाच्या काटय़ावर पळावे लागते आहे; पण बंद पडलेल्या घडाळ्याच्या नव्हे. कारण त्यांचे काटे पुढे जातच नाहीत, असा उपरोधिक टोला त्यांनी राष्ट्रवादीला लगावला.

सैनिकी शाळा सुरू करणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सैनिक टाकळी गावाचा आवर्जून उल्लेख केला. घर तेथे सैनिक अशी परंपरा असलेल्या सैनिक टाकळी गावाचा महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला अभिमान आहे. या गावामध्ये मी जाणार, येथे सैनिकी शाळा सुरू करणारच, असा शब्द त्यांनी जाहीर सभेत दिला.

स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले यांना ‘भारतरत्न’ दिलेच पाहिजे!
भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये महात्मा जोतिबा फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ किताब देण्यासाठी शिफारस करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे, त्याचा संदर्भ घेऊन उद्धव ठाकरे म्हणाले, शिफारस नाही, तर महात्मा फुले आणि सावरकर यांना भारतरत्न दिलेच पाहिजे. आपण आदर्श कोणाला मानतो हे ठरवणारा हा निर्णय असून, तो संपूर्ण महाराष्ट्र मिळून आपण करत आहोत. त्यामुळे भारतरत्नची ही मागणी मान्य झाल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने स्वतःच्या तुंबडय़ा भरल्या
गेली अनेक वर्षे समाजासमाजामध्ये भिंती उभ्या करून काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांची आयुष्य नासवून टाकली आहेत. एकमेकांत भिंती उभ्या करायच्या, समाजात आगी लावायच्या, घरे पेटवून द्यायची आणि स्वतःच्या तुंबडय़ा भरायच्या असले धंदे करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीवाल्यांना निवडून देणार आहात का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या