पाठीत वार करणारी औलाद मित्रपक्षातही नको! उद्धव ठाकरेंनी डागली तोफ

15258

#MahaElection 2019 महाराष्ट्रात सगळीकडे शिवसेना-भाजपची महायुती आहे. पण कणकवली इथे अनेक चांगल्या व्यक्ती असताना देखील भाजपने चांगला उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे ही जागा मी लढतो आहे. भाजप आमचा चांगला मित्र आहे आणि मित्राचं वाईट होऊ नये म्हणून त्यांना सावधगिरीचा इशारा द्यायला आलो आहे, असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राणेंच्या उमेदवारीवरून तोफ डागली. चांगला उमेदवार दिला असता तर इथेही महायुतीचा प्रचार करायला आलो असतो. मात्र ही तर भूतं आहेत. आम्ही भूत गाडली आहेत, त्यांना बाहेर काढू नका. नाही तर ती मानगुटीवर बसतील, मग त्यांना काढणं कठीण होईल, वेळेवर सावध व्हा! असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी कणकवली येथील सभेत बोलताना भाजपला दिला.

मी भाजपच्या चांगल्याचा, भल्याचाच विचार करत आहे. ही पाठीत वार करणारी औलाद आहे, ती माझ्या मित्राकडेही नको, अशा चांगल्या उद्देशानेच मी इथे अधिकृत उमेदवार दिला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी इथे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला विजयी करण्यासाठी आलो आहे. पण याचा अर्थ असा नाही की भाजपशी आमचं भांडण आहे. आमच्यात कोणतंही भांडण नाही. मुख्यमंत्री आणि आमचे चांगले संबंध आहेत, चांगली युती आहे, संपूर्ण महाराष्ट्रात युती आहे. तिथे महायुतीचाच प्रचार करतो आहे. इथे चांगला उमेदवार दिला असता तर त्याच्या प्रचाराला आलो असतो, असेही त्यांनी सांगितले.

इतिहास उगाळायचा नाही, मात्र त्यातून शिकायचं असतं, असं सांगत त्यांनी राणेंचं नाव न घेता इतिहास मांडला. राणेंविषयी बोलताना ते म्हणाले की, ते स्वत: बाहेर गेले नव्हते तर शिवसेनाप्रमुखांनी लाथ घालून त्यांना हाकलून दिलं होतं. शिवसेनाप्रमुख द्रष्टे होते म्हणून त्यांनी हकलले, असेही ते म्हणाले.

शिवसेनेतून हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आज जसे आपण जोरात आहोत तशी काँग्रेस तेव्हा जोरात होती. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावेळी ‘सोनियाजी-काँग्रेसला शुभेच्छा देतो’, अशी प्रतिक्रिया पत्रकारांना दिल्याची आठवण सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणाले की, तेव्हा काँग्रेसला शुभेच्छा दिल्या होत्या आता भाजपला शुभेच्छा देतो. हे अनुभवाचे बोल आहेत, असेही ते म्हणाले.

कोकणातील माणसं ही सुसंस्कृत, भोळ्याभाबडी आहेत. मात्र हा राक्षस आहे, खूनशी वृत्तीचा आहे. मी इथे व्यक्तीविरोधात नाही वृत्तीविरोधात लढतो आहे, असेही ते म्हणाले. शेतकऱ्याच्या जमिनीचा सातबारा कोरा करेन, असे म्हणालो तर इकडून कुणी म्हणाले की सातबारा त्यांना कळतो का? पण मी सांगतो. मला सातबारा कळत नाही. कारण मी दुसऱ्याच्या जमिनी हडप केल्या नाहीत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला.

युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा आरोप ते माझ्यावर करत आहेत. मात्र माझ्यावर आरोप करणारा ‘मातोश्री’च्या मिठाला कधी जागला?असे सांगतानाचा भाजपशी आमची मैत्री आहेच असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र हा मिठाचा खडा वेळेत बाहेर काढला पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

शिवसेना सोडताना त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या आणि काँग्रेसचे गुणगान गायले. काँग्रेसला सोडताना त्यांना शिव्या दिल्या. स्वाभिमान सोडताना त्यांनी एकमेकांना शिव्या दिल्या की काय देव जाणो, असे म्हणत त्यांनी चिमटाही घेतला.

मुख्यमंत्र्यांनी त्यांना काल चांगला सल्ला दिला. मात्र आणखी एक सांगायला हवे होते. पाच वर्ष थांब सांगायला पाहिजे होते, थांबतो का पाहा, असा सल्लाही त्यांनी यावेळी भाजपला दिला.

कोकणवासी कुणाचं वाईट करणार नाही. मात्र हा राक्षस आहे. पोरीबाळी इकडे तिकडे फिरत असतात, त्यांचे फिरणे देखील कठीण झाले होते. मात्र वैभवने ही गुंडागर्दी मोडून काढली आणि चांगले दिवस आणल्याचेही ते म्हणाले.

स्वाभिमान शब्दावरून चिमटा

स्वाभिमान शब्दावरून चिमटा घेत उद्धव ठाकरे म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने कुणी खूश झालं असेल तर तो स्वाभिमान शब्द आहे. कारण वाकली मान आणि म्हणे स्वाभिमान. इकडे वाकवली मान, तिकडे वाकवली मान कसला हा स्वाभिमान? असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या