मतमोजणीच्या वार्तांकनासाठी खासगी कंपनीला ठेका, कोल्हापुरातील प्रकाराने खळबळ

2050

विधानसभा निवडणुकीसाठी उद्या गुरुवारी होणाऱ्या मतमोजणीची तयारी झाली आहे. मतमोजणीचे वार्तांकन करण्यासाठी खासगी कंपनीला ठेका देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापूर, मुंबई, जळगाव यांसह राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत अशाप्रकारे पत्रकारांच्या नावाखाली वार्तांकनासाठी खासगी एजंटांना नियुक्तीचे पत्र निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्याने पत्रकारांमध्ये खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी पत्रकारांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधला असता, निवडणूक आयोगाकडूनच अशा प्रकारची पत्रे देण्यात आल्याचे सांगण्यात आले. एखाद्या खासगी कंपनीला यासाठी नियुक्त करण्यामागे मोठय़ा राजकीय किंवा एखाद्या उद्योगपतीला कंत्राट दिले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

विधानसभा निवडणूक २०१९ – ‘या’ पाच अटीतटीच्या लढतींच्या निकालावर राज्याची नजर

निवडणूक प्रक्रियेत मतदान आणि मतमोजणीसाठी त्या त्या भागातील प्रसिद्धी माध्यमांकडून पत्रकारांच्या नावांची फोटोसह यादी तेथील जिल्हा माहिती कार्यालयामार्फत निवडणूक आयोगाला देण्यात येते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशाच पद्धतीने पत्रकारांना मतदान व मतमोजणीची निवडणूक आयोगाकडून ओळखपत्रे देण्यात आली आहेत. परंतु, यंदा पत्रकारांसह खासगी ठेकेदारामार्फत नियुक्त करण्यात आलेल्या पत्रकारांनाही निवडणूक आयोगाकडून ‘पत्रकार’ म्हणून ओळखपत्रे देण्यात आली आहेत. अगदी मिसरूड न फुटलेल्या मुलांना अशी ओळखपत्रे देण्यात आल्याचे आढळून आले आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील निकालाचे फास्ट कव्हरेज करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान 40 ते 50 ओळखपत्रे देण्यात आली असून, या कामात प्रत्येकाला किमान दोन हजारांचे मानधन देण्यात येणार असल्याचेही अशा ‘एजंट’ पत्रकारांकडून सांगण्यात आले. या संदर्भात जिल्हा माहिती कार्यालयाशी संपर्क साधला असता, अशा प्रकारची ओळखपत्रे निवडणूक आयोगाकडूनच आली आहेत, असे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या