देश में रहेना हो तो ‘वंदे मातरम्’ कहेना होगा! एकनाथ खडसेंनी अबू आझमींना खडसावले

411

सामना प्रतिनिधी, मुंबई

मानेवर सुरी ठेवली तरी वंदे मातरम् बोलणार नाही, असे फूत्कार काढणाऱ्या अबू आझमी आणि वारीस पठाण यांना विधानसभेत शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी चांगलेच खडसावले. या दोघांच्या ‘वंदे मातरम्’विरोधी वक्तव्याला जोरदार आक्षेप घेत अनिल गोटे, एकनाथ खडसे यांनी आक्रमक पवित्रा घेत ‘हिंदुस्थान में रहेना हो तो वंदे मातरम् कहेना होगा’ असे ठणकावतानाच ‘वंदे मातरम् म्हणायचे नसेल तर तुमच्या देशात चालते व्हा,’ असा इशाराच विधानसभेत देण्यात आला.

अबू आझमी आणि वारीस पठाण यांच्या वक्तव्याचे विधानसभेत तीव्र पडसाद उमटले. विधानसभेचे कामकाज सुरू होताच भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे अबू आझमी व वारीस पठाण यांच्या राष्ट्रदोही वक्तव्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ‘वंदे मातरम्’चा अर्थ ‘या भूमीला, भारतमातेला मी वंदन करतो…’ पाकिस्तान हे मुस्लिम राष्ट्र आहे. त्या देशात राहून असे वक्तव्य करण्याची तुमची हिंमत झाली असती का? असा सवाल करतानाच परमवीरचक्र विजेते अब्दुल हमीद यांनी पॅटर्न रणगाडा तोडला होता. त्यावेळी वंदे मातरम्, भारत माता की जय… हा त्यांनी शेवटचा शब्द उच्चारला होता याची आठवण करून दिली. त्यामुळे या देशात राहायचे असेल तर वंदे मातरम् म्हणावेच लागेल. तुम्हाला तसे बोलायचे नसेल तर तुम्ही तुमच्या देशात चालते व्हा, असा इशारा गोटे यांनी दिला. त्यावेळी सभागृहात एकच गदारोळ झाला.

त्या मातीला नमन करण्यात चुकीचे काय?
गोटे शांत होत नाहीत तोच माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही या नेत्यांना हिंदी भाषेतूनच फैलावर घेतले. ‘देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी जन गण मन किंवा जय हिंदचा नारा नव्हता. स्वातंत्र्याची लढाई वंदे मातरम् गातच युद्ध लढले गेले तर मग वंदे मातरम् बोलण्यात चुकीचे काय आहे, असा सवाल खडसे यांनी केला. ‘माँ तुझे सलाम’…जिथे आम्ही जन्मलो, जिथे आम्ही फुकटचे अन्नपाणी घेता, मृत्यूनंतर जमीन, कफन इथलीच असेल. जिथे तुम्ही वाढलात, लहानाचे मोठे झालात, मृत्यूनंतरही याच मातीत अत्यंसंस्कार होणार असतील तर त्या मातीला नमन करण्यास अडचण काय? असे खडसे त्यांना उद्देशून म्हणाले. वंदे मातरम् गाऊ नका हे कोणत्या धर्मात लिहिले आहे हे मला दाखवा. माँ तुझे सलाम याचा अर्थ मातृभूमीला सलाम असा आहे. त्यामुळे वंदे मातरम् बोलणार नाही अशी मुजोरी चालणार नाही. या देशात राहायचे असेल तर ‘वंदे मातरम्’ बोलावेच लागेल, अशा शब्दांत खडसे यांनी त्यांना खडसावले.

वारीस पठाण-पुरोहित यांच्यात बाचाबाची
या घटनेबाबत मीडिया स्टॅण्डसमोर बोलण्यासाठी गेलेल्या वारीस पठाण आणि राज पुरोहित यांच्यात बाचाबाची झाली. वारीस पठाण या स्टॅण्डसमोर जात असतानाच तिथे राज पुरोहित, अनिल गोटे आणि कॅप्टन तमिल सेल्वन हेही पोहोचले. यावेळी पुरोहित यांनी पठाण यांना मागे खेचल्याने दोघांमध्ये एकच जुंपली. सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करीत हे भांडण सोडवले.

शिवसेना-भाजप सदस्यांची घोषणाबाजी
कोणतेही गीत गाऊन देशभक्ती सिद्ध होत नाही. मनातून भावना पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातही मुस्लिम शिलेदार होते. पण आमचा धर्म आम्हाला हे म्हणायला परवानगी देत नाही. तेव्हा आम्ही वंदे मातरम् म्हणणार नाही. आमचा धर्म फक्त अल्लालाच मानतो. तुम्हाला फक्त राजकारण करायचे आहे, असे तारे अबू आझमींनी तोडताच शिवसेना-भाजपचे सदस्य आक्रमक झाले. यावेळी जितेंद्र आव्हाड, इम्तियाज जलील, वारीस पठाण हे सदस्य आझमींच्या मदतीला धावले असता शिवसेना-भाजपच्या सदस्यांनी उभे राहत आझमींची हुर्यो उडवीत ‘वंदे मातरम्’चा जोरदार नारा दिला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करीत शांत राहण्याची सूचना केल्यानंतर वातावरण निवळले.

देशासाठी लढणाऱ्या सैनिकांचा अवमान – डॉ. नीलम गोऱ्हे
विधिमंडळाच्या आवारातच ‘मी वंदे मातरम् म्हणणार नाही,’ असे फूत्कार काढणाऱ्यांना आज शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे सुनावले. वंदे मातरमला विरोध म्हणचे या देशाचे हित आणि आणि देशाच्या लढणाऱ्या सैनिकांचा अवमानच असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. विधिमंडळ सदस्य असणाऱ्या एका आमदाराने ‘मी वंदे मातरम् म्हणणार नाही’ असे सांगून विधान भवनाच्या आवारात जो बालिश गोंधळ घातलाय तो प्रकार निंदनीय असल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले. त्याऐवजी त्यांनी आपले म्हणणे कोर्टात मांडायला हवे होते. आपल्या देशाचे सैनिक आपली सीमा राखीत असतात, रक्त सांडत असतात. देशभरात वंदे मातरम् म्हणणे लोकांना खरोखरीच अभिमानाची गोष्ट असताना आपण अशा पद्धतीने कांगावा करणे हा देशहिताचा अपमान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. न्यायालयाच्या आदेशानुसार वंदे मातरम् या गीतातील काही ठरावीक भाग वगळून तेच गीत सभागृहात गायले जाते. त्यालाही विरोध करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे असे मत त्यांनी मांडले.

जबरदस्ती कराल तर मीही ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही – स्वामी अग्निवेश
महाराष्ट्र मुस्लिम अवामी कमिटीच्या संभाजीनगर येथील धरणे आंदोलनात स्वामी अग्निवेश म्हणाले की, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीही वंदे मातरम् म्हणावे लागणार असल्याचे सांगत आहेत. यावरूनच देश कोणत्या पातळीवर जात आहे हे दिसून येते. जबरदस्ती कराल तर मीही ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही. देशभक्तीचे धडे देणे बंद करा. अन्याय-अत्याचारांच्या विरोधात लढावे लागणार आहे. दिल्लीत मुस्लिमांनी आंदोलन केले तर या आंदोलनात सर्वात पुढे मी असेन अशी मुक्ताफळे स्वामी अग्निवेश यांनी यावेळी बोलताना उधळली.

आपली प्रतिक्रिया द्या