महाराष्ट्र बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद

सामना प्रतिनिधी । नागपूर

भीमा-कोरेगावच्या घटनेच्या निषेर्धात पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भात संमिश्र प्रतिसाद मिळाला. नागपूरसह काही ठिकाणी जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या. भाजपचे आमदार नाना शामकुळे यांच्या चंद्रपूर येथील कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. नागपूरच्या इंदोरा चौकात पोलिसांवर पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला. ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळा संचालकांनी शाळा बंद ठेवल्या. विमान कंपन्यांनी मुंबई व दिल्लीहून येणारी विमाने रद्द केली आहेत. त्यामुळे रणजी विजेता विदर्भ संघाचे नागपुरातील आगमन लांबणीवर पडले आहे.

भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानंतर आज नागपूरसह विदर्भात दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच चौकाचौकात टायर पेटवून तर काही वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला. सकाळी साडेदहा वाजेनंतर नागपुरातील बाजारपेठ उघडल्या. आंदोलनकर्ते आल्यानंतर दुकानदारांनी आपली दुकाने तात्पुरती बंद केली. त्यानंतर परत आपले व्यवसाय सुरू केले. दलित कार्यकर्ते समुहाने नरेंद्र मोदी मुर्दाबाद नारे देत रस्त्यावर रास्ता रोको केला.

नागपूरच्या संविधान चौकात आंदोलनकर्त्यांनी दगडफेक व रस्ता रोको केल्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. आंदोलनकर्त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी शिघ्र कृतीदल तैनात करण्यात आले आहे. विदर्भात ठिकठिकाणी हीच स्थिती असल्याने कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयावर दगडफेक झाल्यानंतर चंद्रपुरातील अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्यावर घरासमोर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यवतमाळमध्ये बसस्थानकाजवळ रस्ता रोको करण्यात आला. तसेच अमरावती येथे इर्विन चौक व जवाहर गेटजवळ तणावाची स्थिती निर्माण झाली. जवाहर गेटजवळ जाळपोळ करण्यात आला. अमरावती जिल्ह्यात एस. टी. बस सेवा बंद करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध येथे शांती मार्च काढण्यात आला. वर्धा शहरात या घटनेच्या निषेधार्थ रस्ता रोको करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या