बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्र बंद (Maharashtra Bandh) पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधला. उद्याचा बंद हा राजकीय कारणासाठी नाही. विकृती विरुद्ध संस्कृती या करता उद्याचा हा बंद आहे, असं सांगतानाच त्यांनी बंदच संपूर्ण स्वरुप समोर मांडलं.
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत, तसाच उद्याचा बंद राहील. कडकडीत बंद असायला पाहिजे. मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णवाहिका सेवा, वृत्तपत्र, अग्निशमन दल यासह आणि ज्या-ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या सुरू राहतील’.
पुढे येणारे सण लक्षात घेता उद्धव ठाकरेंनी माहिती दिली की, ‘एकूणच पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत. गणपती बाप्पा येत आहेत. दहीहंडीची प्रॅक्टीस सुरू आहे. हा सर्व विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी 2 वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा, अशी विनंती आहे’.
अनेकांना उत्सव पण करायाचे आहेत, उत्साह पण आहे. त्याच्यामध्ये पण अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुली सुरक्षित राहतील की नाही? हा सुद्धा प्रश्न त्यांच्या सगळ्यांच्या मनात आहे,असं त्यांनी यावेळी अधोरेखित केलं.