Video – कोविडमध्ये राजकारण नको, इम्प्रेशन खराब होणार; भर मीटिंगमध्ये गडकरींनी टोचले फडणवीसांचे कान

कोरोना संकटात सुरु असलेल्या राजकारणावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यसह अनेक भाजप नेत्यांचे कान टोचले आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नागपूर भाजपा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना नितीन गडकरी म्हणाले आहेत की, ‘कोविड काळात राजकारण करू नका. सगळ्याच गोष्टीत झेंडे आणि बोर्ड लावले पाहिजे असं नाही. अशा वेळेत राजकारण केले तर ते लोकांना आवडत नाही. तुम्ही केलेल्या सेवा कामाचा फार बागुलबुवा करू नका. एकाच ऑक्सिजन सिलेंडर 4 जण फोटो काढतात हे चांगले नाही. त्यातून आपल्याबद्दलचा दृष्टीकोन बदलतो. राजकारण म्हणजे सत्ताकारण नाही. समाजकारण, विकासकारण, राष्ट्रकारण म्हणजे राजकारण आहे,’ असं गडकरी म्हणाले आहेत. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्यसह भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

याच व्हर्चुअल बैठकीत ते पुढे म्हणाले आहेत की, ‘नुसत्या निवडणुका लढवणं आणि सत्तेत जाणं एवढाच त्याचा भाग नाही, यावेळी गरिबांच्या मागे, समाजामागे धर्म, पक्ष विसरून मदत करा. त्याचे फळ पक्षाला नक्की मिळतं. वाईट काळात कार्यकर्त्यांच्या मागे राहिलो तर ते कधीच विसरत नाही. राजकीयदृष्ट्या विरोधक असले तरी सगळ्यांच्या मागे उभं राहणं सामाजिक दायित्व आहे. मला कोविड होत नाही म्हणून काहीजण गाफील राहतात. आजही अनेक नगरसेवक, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी कोविडमध्ये बेफिकिरपणे वाहत आहे, असं ते म्हणाले आहेत.

गडकरी यांनी या बैठकीत बोलत असताना भाजप कार्यकर्त्यांना, ‘कोणाच्या घरी जाऊ नका’ असं आवाहन केलं आहे. तसेच ते म्हणाले की, ‘तुम्ही जितकं सहजपणे घेता तसं घेऊ नका. जी कामं आहेत ती घरून करा. कार्यकर्त्यांना गमावणं पक्षाला परवडणारं नाही. आपला जीव वाचला तर पक्षाचं काम होईल. मी रोज सकाळी 1 तास प्राणायम करतो. या व्यायामामुळे माझी तब्येत ठीक आहे. उर्जा वाढली. औषधं घेऊन तब्येतीची काळजी घेऊन कामं करतो. कामाच्या भावनेच्या भरात अनेकांनी काळजी घेतली नाही. पहिलं प्राधान्य आपलं आरोग्य, आपलं कुटुंब त्यानंतर पक्ष आणि समाजाचं काम करणं. स्वत:कडे लक्ष द्या’, असं ते म्हणाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या