‘खाते’ ‘कोण’ते यावरून वाटप लांबले! शिंदे–फडणवीसांमध्ये ‘गृह’कलह

शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. पण मंत्रिमंडळात तुला काय, मला काय? याच्या हिसाब-किताबावरून सुरू असलेल्या लोच्यालपाटामुळे नव्या  मंत्र्यांचा शपथविधी होऊन दोन दिवस झाले तरी ‘खाते कोण’ते याचा तिढा अद्याप सुटू शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ‘गृह’कलहामुळे लांबलेले खातेवाटप 15 ऑगस्टपूर्वी तरी होण्याची शक्यता नाही. यामुळे स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी पालकमंत्र्यांऐवजी मंत्र्यांची तात्पुरती सोय करण्याची नामुष्की ओढवली आहे. दरम्यान, खातेवाटपाचा तिढा सोडविण्यासाठी पुन्हा दिल्लीदरबारी धाव घेण्याची वेळ ‘ईडी’ सरकारवर आली आहे.

महाराष्ट्रात बंडखोरी करून सत्तेत आलेल्या सरकारचा बहुचर्चित विस्तार तब्बल 39 दिवसांनंतर पार पडला. ‘ईडी’ कृपे करून शिंदे गट आणि भाजपचे प्रत्येकी 9 अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.

  राजभवनावरील शपथविधी सोहळय़ानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी खातेवाटप बुधवारी होईल असे जाहीर केले होते. मात्र मंत्रिमंडळ विस्ताराला 48 तास उलटले तरी खातेवाटपाला मुहूर्त सापडला नसल्याने बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात गुरुवारी झालेल्या बैठकीत खातेवाटपासंदर्भात अंतिम निर्णय होऊ शकला नाही. विधिमंडळाचे अधिवेशन 17 ऑगस्टला सुरू होत आहे. त्याच्या एक-दोन दिवस आधी खातेवाटप केले जाण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री नसल्याने 15 ऑगस्टच्या ध्वजवंदनासाठी मंत्र्यांची तात्पुरती सोय

स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होते. 15 ऑगस्टला चार दिवस शिल्लक राहिले तरी पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळात समावेश झालेल्या मंत्र्यांकडे 19 जिह्यांत ध्वजवंदनाची जबाबदारी सोपवून तात्पुरती सोय करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील मुख्य कार्यक्रमात ध्वजवंदन करतील. राज्याच्या उर्वरित जिह्यांमध्ये जिल्हाधिकाऱयांमार्फत ध्वजारोहण करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ मंत्र्यांना हवे मलबार हिलला बंगले

ज्येष्ठ मंत्र्यांनी मंत्रालयाजवळ बंगले नको असा हट्ट धरला आहे. मंत्रालयाजवळ बंगले असल्यास व्हिजिटर्सची गर्दी वाढते आणि काम करणे मुश्कील होते. अनेकदा मंत्रिमंडळाची बैठक किंवा खात्याची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात येते. त्यामुळे मलबार हिल परिसरातच निवासस्थान मिळावे असा हट्ट अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी धरला आहे.

वजनदार आणि मलईदार खात्यांसाठी रस्सीखेच

आपल्याकडे 106 आमदार असतानाही भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले असले तरी महत्वाच्या खात्यांबाबत मात्र भाजप आग्रही असल्याने खातेवाटप रखडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपाने गृह, महसूल, अर्थ, जलसंपदा, सहकार, ग्रामविकास या प्रमुख खात्यांपैकी कोणतेही खाते सोडण्यास नकार दिला आहे. 2014 ते 19 या काळात शिवसेनेकडे जी खाती होती तीच खाती शिंदे गटाला देण्याची तयारी भाजपाने दर्शवली होती. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते राहणार आहे. तर शिंदे गटाने पूर्वीच्या उद्योग, परिवहन, आरोग्य,कृषी या खात्यांसह महसूल, ग्रामविकास, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम या खात्यांसाठी आग्रह धरला आहे.

  •  उच्च तंत्र शिक्षण खात्यासाठी उदय सामंत आणि तानाजी सावंत यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
  • चंद्रकांत पाटील आणि राधाकृष्ण विखेपाटील यांच्यात महसूल खात्यावरून धुसफूस.
  • गुलाबराव पाटील सहकार खात्यासाठी आग्रही. मंगलप्रभात लोढा यांचा नगरविकास खात्यावर डोळा आहे, तर दीपक केसरकर अर्थ खात्यासाठी आग्रही आहेत.