विशेष – राज्यभरात ठिकठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी

594

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात उत्साहात साजरी करण्यात आली. राज्यभरात विविध ठिकाणी शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

भीमेच्या पात्रात अवतरले ‘छत्रपती’

pandharpur

भिमानदीच्या पात्रामध्ये अनपेक्षितपणे छत्रपती शिवराय अवतरल्याने महाराजांना अभिवादन करण्यासाठी पंढरपूर पंचक्रोशीतील शिवभक्तांनी कौठाळी नदीतीरावर तोबा गर्दी केली. त्याचे असे झाले तालुक्यातील कौठाळी हद्दीतील भीमा नदीच्या पात्रामध्ये प्रवीणनगरे व सुरज नगरे या शिवप्रेमी बंधूंनी तराफ्यावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा साकारून आगळीवेगळी शिवजयंती साजरी केलीय. ही अनोखी शिवजयंती पाहण्यासाठी आणि शिवरायांना अभिवादन करण्यासाठी शिवभक्तांची होडीच्या साह्याने रीघ लागली आहे.

हजारो महिलांच्या उपस्थितीत रंगला शिवजन्मोत्सव

solapur
सोलापूर – ‘जय भवानी… जय शिवाजी…’चा जयघोष, ‘तुमचं आमचं नातं काय… जय जिजाऊ…जय शिवराय’ अशी शिवप्रेमींकडून एकमेकांना घातली जाणारी साद… असा शिवमय माहोल सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी मध्यरात्री निर्माण झाला होता. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त जमलेल्या सर्वधर्मीय महिला,वृद्ध,मुले, तरुण,तरुणी यांचा उत्साह गगनाला भिडल्याचे जाणवले. यंदाच्या सोलापुरातील शिवजन्मोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यरात्री झालेला पाळण्याचा सोहळा! यंदा प्रथमच जन्मोत्सवाचा पाळणा होणार असल्याची वार्ता शहर व परिसरात पसरली होती. त्यामुळे विविध भागातून महिला,पुरुष, तरुणाईची पावले शिवाजी चौकाकडे वळली.

शिवजयंती निमित्त माळीवाडा येथे आकर्षक रोषणाई

nagar
नगर – शिवजयंती निमित्त माळीवाडा येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने भव्य आकर्षक विद्यत रोषणाई करण्यात आली. तसेच शिवजयंती निमित्त मिरवणुकीचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील, जिल्हा मराठाचे विश्वस्त आदी उपस्थित होते.

युवक बेरोजगार समितीतर्फे सार्वजनिक वाचनालयास छत्रपतींची प्रतिमा भेट

tumsar
तुमसर – अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक रामकृष्ण नगर येथील श्री संताजी स्नेही समाज मंडळस्थळी सार्वजनिक वाचनालयात युवक बेरोजगार कृती समितीच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष हरीचंद्र बरडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले.

शिवसेनेच्यावतीने भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन

madha
माढा – जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने माढा शहर शिवसेनेच्या वतीने भव्य मोटार सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत शिवसैनिकानी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. माढेश्वरी मंदिरापासून याची सुरुवात झाली संपूर्ण गावात शिवाजी महाराजांच्या जयघोषात रॅली काढण्यात आली. शिवसेना शहर प्रमुख शंभू साठे यांनी याचे आयोजन केले होते.

तोंडवळी गावात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक

malvan
मालवण – मालवण तालुक्यातील तोंडवळी गावात कै. सुनील पाटील मित्रमंडळाच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अर्ध पुतळ्याची पालखी मिरवणूक संपूर्ण गावातुन काढण्यात आली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी महाराज्यांसह ऐतिहासिक वेशभूषा परिधान केल्या होत्या..

शिवसेनेच्या वतीने कुडाळात शिवजयंती साजरी

kudal
कुडाळ – कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने येथील शिवसेना शाखेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी तालुका प्रमुख राजन नाईक, माजी सभापती राजन जाधव, नगरसेवक बाळा वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.

सार्वजनिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी

pen
पेण – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज पेण तालुक्यासह शहरात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सार्वजनिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज पेण येथे सकाळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये शाळेतील मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ माँ साहेब, सोयराबाई, तसेच मावळे यांचे वेगवेगळे पेहराव परिधान करण्यात आले होते. तर काही मुलांनी शिवरायांचे पोवाडे सादर करून नाशिक ढोल, लेझिम यांचेही प्रात्येक्षिक दाखविण्यात आले. यावेळी बोलतांना अध्यक्ष पी.डी. पाटील यांनी शिवाजी महाराजांच्या शौर्याची कथा त्यांच्या राज्यकारभाराची वैशिष्ट्य आणि गडकिल्ल्यांची माहिती त्यांनी विद्यार्थी यांना दिली.

कोपरगावमध्ये शिवजयंतीचा जल्लोष !

kop

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण देशभरात साजरी होत आहे. त्या निमित्तानं कोपरगाव शहरात ठिकठिकाणी मिरवणुका, शिव पालखी, सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नगरपालिकेच्यावतीने सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, अभिवादन, प्रतिमा पूजन, रोषणाई, करण्यात आली होती. शहरातील शिवाजी बाल उद्यान येथील छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुर्णाकृती पुतळ्यास पहाटे महामस्तकाभिषेक करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या