राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषिरत्न, कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण पुरस्कारांसह इतर कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. (2017, 2018, 2019 या तीन वर्षांचे पुरस्कार वितरण)कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासह विभागाचे सचिव एकनाथ डवले, पुरस्कार प्राप्त शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्याचे प्रतिनिधी आणि अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
- पुरस्कार प्राप्त सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन
- अन्न दात्याचे महत्व अनन्यसाधारण. तो आनंदी तर देश सुखी, समृद्ध आणि वैभवशाली
- आपला देश कृषी प्रधान देश आहे आणि आपण शेतकरी बांधव देशाचे खरे खुरे वैभव आहात
- दोन वर्षात कोरोनाचे संकट जगभर. आजही या संकटाचा सामना आपण करत आहोत
- या दोन वर्षात अर्थचक्र मंदावलं होतं आता ते थोडं गती घेत आहे
- लॉकडाऊन काळात आर्थिक चक्र सावरण्याचं काम या अन्न देवतेने केले.
- आम्हाला शहरातील लोकांना गहू तांदूळ वाण्याच्या दुकानातून येतो एवढच माहित पण त्यासाठी शेतकरी किती कष्ट उचलतो याची आमच्यासारख्या शहरातील लोकांना फारशी कल्पना नसते.
- लॉकडाऊनमध्ये वर्क फ्रॉम होम ही संकल्पना आपण राबवली. हे वर्क फ्रॉम होम शेतकऱ्यांना सांगितलं असतं आणि त्यांनी ते केलं असतं तर काय झालं असतं?
- आपण सगळे शेवटी मर मर मेहनत करतो ते कशासाठी तर दोन घासासाठी ते घास देणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष झालं तर काय होईल, कोरोनापेक्षा मोठं भुकमारीचं संकट सगळ्या जगभर उभं राहिल
- संकट येतात जातात पण त्यात ताठ पाठकण्याने उभे राहातात ते आमचे शेतकरी आणि शेतात काम करणाऱ्या माता भगिनी आहेत.
- पुरस्काराची रक्कम गौण आहे, शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल यातून मोजताच येत नाही. अस असलं तरी विभागाने सुधारित रकमेसाठी प्रस्ताव पाठवावा
- शेतात मोठ्या संख्येने महिला काम करतात. मी अनेकदा त्यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी तळहातावरच पोट काय असतं हे या संवादातून दिसून आलं.
- शेतात कुटुंबातील आजीपासून नातीपासून काम करताना आपल्याला दिसतात.
- स्वत:ची चिंता बाजूला ठेऊन राज्य आणि देशाचं भूक भागवण्याचं काम शेतकरी करत असतात
- चाकोरीबद्ध जीवन बाजूला सारून जेंव्हा शेतीत नवीन प्रयोग केले जातात तेंव्हा त्यांचे कौतूक कितीही केलं तरी कमीच. तुमच कौतूक आणि तुमचा सन्मान करायला मिळणं हेच आमचं भाग्य
- यात मी एक नाव प्रातिनिधिक घेऊ इच्छितो ज्यांनी चांगलं काम केलं
-
नगरच्या राहीबाई पोपरे यांचं, त्यांनी पहिली बियाणे बँक आपल्या घरात निर्माण केली
- बियाणांची बँक एक आगळी वेगळी कल्पना.
- कौतूक करतांना अनेकदा आपण परदेशाकडे बघतो पण आपल्याकडील नावीन्यपूर्ण उपक्रमांकडे ही आपण लक्ष दिले पाहिजे.
- आपल्याकडचा तांदुळ, गहु आरोग्यदायी होता हे आपल्याला आता मागे वळून पाहिल्यानंतर कळू लागलं आहे
- मला शेती कळत नसली तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू कळतात ते पुसण्यासाठी काम करायचं आहे, करत आहे.
- मला अनेकजण म्हणाले, असे निर्णय निवडणूकीच्या तोंडवर जाहीर होतात पण शेतकऱ्यांना दिलेलं वचन सरकार सत्तेत आल्यानंतर आल्या आल्या पुर्ण करणं हे दिल्या शब्दाला जागण्यासारखं होते तेच आम्ही केलं
- नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना आपण प्रोत्साहन रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे
- शेतकऱ्यांसाठी जे जे करणं शक्य ते ते करणार
- आपण महामार्ग निर्माण करतो. आपण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग करत आहोत ज्याने राज्यात समृद्धी येणार आहे. शेतकऱ्यांसाठी हमरस्ते महत्वाचेच पण त्याला जोडणारे पाणंद रस्ते तयार करण्याची योजनाही आपण रोहोयोमार्फत धडाक्यानं राबवित आहोत.
- विकेल ते पिकेल अंतर्गत शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे
- जसं एखाद्या उद्योग धंद्यासाठी मार्केट रिसर्च केलं जातं तसंच शेतकऱ्यांच्या पिकांसाठीही बाजारपेठ संशोधन अतिशय महत्वाचा भाग आहे. कोणत्या पिकाला कुठे चांगला भाव आहे, कोणत्या पिकाला मागणी आहे हे शेतकऱ्याला सांगणं महत्वाचं आहे. विकेल ते पिकेलमध्ये हेच काम आपण हाती घेतलं आहे.
- शेतकऱ्यांना हमी नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, हेच या विकेल तेच पिकेलचं धोरण आहे
- आपल्या कृषीप्रधान देशात आणि राज्यात शेतकऱ्यांना आत्महत्याची वेळ कदापि येता कामा नये, कर्जाच्या दुष्टचक्रात तो भरडला जाऊ नये यासाठी त्याच्यापाठीशी खंबीरपणे उभं राहणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
- जो राज्याला जगवतो त्याचे जगणं सुसह्य करणं हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.
- आज विविध पुरस्कारांनी शेतीत नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार दिले जात आहेत. खरं तर तुमचा सन्मान करण्याचा मान आम्हाला मिळतो याचा आनंद आहे.