सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी, मुख्यमंत्र्यांचा तत्काळ सकारात्मक प्रतिसाद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करावे, अशी मागणी शिवसेनेचे संसद गटनेते तथा खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. या मागणीला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दिलेल्या प्रतिसादाबद्दल खासदार विनायक राऊत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैद्यकीय सेवांचा अभाव पाहता विशेषत: अपुरी असलेली डॉक्टरांची संख्या विचारात घेता त्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणे अतिशय आवश्यक आहे. गेली 5 वर्षे सर्वच शिवसेनेचे लोकप्रतिनिधी त्यासाठी प्रयत्न करीत होते. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व आल्यानंतर सिंधुदुर्ग वासियांची ही मागणी पूर्ण होईल अशी खात्री झाली होती. काही दिवसांपूर्वीच कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेल्या आरटीपीसीआर लॅबच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील जनतेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करणार असल्याची घोषणा केली होती.

तोच धागा पकडून खासदार विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्राद्वारे सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबत विनंती करताच मुख्यमंत्र्यांनी तत्काळ वैद्यकीय शिक्षण संचालनालयाला या संदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हयांमध्ये आता लवकरच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु होऊन जिल्हा वासियांच्या सेवेमध्ये रुजू होणार आहे. खासदार विनायक राऊत यांच्या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तत्काळ दिलेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या