मोदींवरील टीकेने नोकरी गेली!

43

सामना प्रतिनिधी । नगर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण सोशल मीडियातून व्हायरल केल्याप्रकरणी संगमनेर येथील पोलीस कर्मचारी रमेश शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. शिंदे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून काम करीत होते. दरम्यान, अशा प्रकारची कारवाई राज्यामध्ये पहिल्यांदाच झाली असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह लिखाण काही दिवसांपूर्वी केल्यानंतर संगमनेर येथील भाजपच्या एका नेत्याने याची दखल घेऊन येथील जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची शर्मा यांनी दखल घेऊन या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सायबर सेलला आदेश दिला होता.

पोलीस कर्मचारी शिंदे हे याअगोदरसुद्धा अशाप्रकारे आक्षेपार्ह मजकुराच्या संदर्भात आले असल्याचे पुढे आले आहे, पण आता सायबर सेलने केलेल्या चौकशीमध्ये आक्षेपार्ह मजकूर टाकल्याप्रकरणी तसेच तो इतर ग्रुपलाही प्रसारित केला होता हे चौकशीमध्ये आढळून आल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी संबंधित पोलीस कर्मचाऱयास तत्काळ निलंबित केले.

दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱयांना आता नोटिसा बजावण्याची प्रक्रिया काही ठिकाणी सुरू करण्यात आली होती पण संगमनेर येथे पोलीस कर्मचारी शिंदे हे माजी मंत्री विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांचे अंगरक्षक म्हणून कार्यरत होते. नेमका मजकूर त्यांनी कशा पद्धतीने टाकला हे मात्र समजू शकले नाही. चौकशीदरम्यान काही गोष्टी उघड झाल्यामुळेच ही कारवाई करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या