“नाशिकमध्ये आमचं घर फोडलं, पण अमरावती-नागपुरात भाजप नेत्यांनीच आम्हाला मदत केली!”

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने सत्ताधारी भाजपच्या दारुण पराभव केला. नागपूर, संभाजीनगर, अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचा विजयी झेंडा फडकला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जबरदस्त धक्का बसला असून महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी झाले. या विजयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर चांगलेच तोंडसूख घेतले.

भारतीय जनता पक्षाने सत्तेचा दुरुपयोग केला असून त्याची फळं आता भोगत आहेत. अमरावती आणि नागपुरातमध्ये भाजप नेत्यांनीच आम्हाला मदत केली. भाजप दुसऱ्याची घरं फोडत, आमचा नेता फोड त्याचा आनंद साजरा करत आहेत. पण यापुढे आता भाजपचे 50 नेते फोडू, असे नाना पटोले म्हणाले.

तांबेंचा निर्णय हायकमांड घेईन

नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला असून याबाबत विचारले असता ते म्हणाले की, त्यांच्याबाबत जो काही निर्णय असेल तो हायकमांड घेईल. पक्षाने सांगितले असते तर आम्ही त्यांना तिकीट दिले असते, पण असा कोणताही आदेश नव्हता. नाशिकमध्ये डॉ. सुधीर तांबे यांनी आमचा विश्वास घात केला, या वक्तव्यावर आपण ठाम आहोत, असेही ते म्हणाले.

…तर तिकीट दिले असते

डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले असते की सत्यजीतला तिकीट द्या तर आम्ही तिकीट दिले असते. मात्र इथे आमचा विश्वासघात झाला. या सगळ्या गोष्टी भाजपने घडवून आणल्या. याचे परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागतील, असा इशारा पटोले यांनी दिला.

MLC Election विदर्भात भाजपला जबरदस्त झटका, दोन्ही जागा गमावल्या

भारत जोडो यात्रेचे फळ

सुधाकर आडबाले यांच्या विजयाबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, विदर्भ हा पहिल्यापासून काँग्रेसचा गड राहिला असून चुकीच्या समन्वयामुळे आम्ही मागे पडलो. परंतु यावेळी आम्ही एकदिलाने लढलो. राहुल गांधीही भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले. मराठवाडा, विदर्भात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आणि हा विजय साकारता आला.