राज्यातल्या धरणांमध्ये 43.16 टक्केच पाणीसाठा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात अधिक पावसाची गरज

266

राज्यात यंदा नैऋत्य मान्सून चांगला सक्रिय झाला आहे. परिणामी राज्यात सरासरीपेक्षा 15 टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. पण तरीही राज्यातील धरणे फक्त 43.16 टक्केच भरली आहेत. मुंबईला पाणी पुरवठा करणारी धरणेही अजून अर्धी भरलेली नाहीत मराठवाडय़ायत तर सर्वाधिक पाऊस आहे. मात्र विदर्भात सरासरीपेक्षा पाच टक्के कमी पाऊस आहे. त्यामुळे धरणे तुडुंब भरण्यासाठी मध्य महाराष्ट्र व विदर्भात वरुणराजाच्या कृपेची गरज आहे.

राज्याच्या अनेक भागात पावसाने चांगली हजेरी लाकली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात मान्सन सक्रीय आहे. सिंधुदुर्ग व कोकणात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. पण अजूनही राज्यातल्या सोळा जिह्यांमध्ये आतापर्यंत सरासरी पाऊस झाला आहे. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली गडचिरोली आदी जिह्यांचा समावेश आहे.

मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस आहे. त्यामुळे राज्यातल्या टँकरची संख्याही कमी आहे. पावसाचे प्रमाण चांगले असल्यामुळे टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रमाणही घटले आहे. मागील आठवडय़ातील आकडेवारीनुसार राज्यात फक्त 43 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा सुरु होता. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात 86 टँकरने पाणी पुरवठा होत होता. मात्र पावसाने हजेरी लावल्याने टँकरची संख्या निम्म्याने घटली आहे. मागील वर्षीच्या जुलै महिन्यात राज्यात तब्बल 4 हजार 798 टँकरच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याची वेळ आली होती अशी माहिती जलसंपदा खात्यातील अधिकाऱयाने दिली.

राज्यातील धरणातील पाणीसाठा (टक्क्यांमध्ये)
बारवी- 57. 31
मुळशी टाटा- 22. 94
दूधगंगा- 61.79
कोयना – 42.59
तिल्लारी – 80.18
पैठण- 41.42
भंडारदरा – 41. 25
नाशिक गंगापूर – 51.76
दारणा नाशिक – 57.32

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया धरणातील पाणीसाठा टक्क्यांमध्ये
तानसा – 25. 10
भातसा – 47. 13
मोडकसागर- 42. 33
मध्य वैतरणा – 11.29

धरणातील पाणीसाठा

उपयुक्त पाणीसाठा – 34. 24 टक्के
मृतपाणीसाठा 89. 7 टक्के
एकूण पाणीसाठा – 43. 16 टक्के

(सर्व आकडेवारी जलसंपदा विभागातील)

सरासरीपेक्षा अधिक पाऊस
संपूर्ण महाराष्ट्रात यंदा सरासरीपेक्षा 15 टक्के अधिक पाऊस आहे आणि मराठवाडय़ात सर्वात अधिक पाऊस आहे ही एक आनंदाची बाब आहे.

यंदा पावसाचे प्रमाण
कोकण गोव्यात सरासरीपेक्षा 21 टक्के जास्त
मध्य महाराष्ट्र सरासरीपेक्षा 20 टक्के अधिक
मराठवाडा- सरासरीपेक्षा 47 टक्के जास्त
विदर्भात सरासरीपेक्षा 5 टक्के उणे

म्हणून पाणीसाठा कमी
धरणे अजून का भरली नाहीत याची कारणे सांगताना प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक डॉ. कृष्णानंद होसाळीकर म्हणाले की, राज्यातील बहुतांश धरणे मध्य महाराष्ट्र व विदर्भात आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस असला तरी तेवढा जास्त नाही. आणि विदर्भात पाऊस सरासरीपेक्षा पाच टक्के कमी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ात वाढ न झाल्याचे एक कारण असू शकते.

काळजीचे कारण नाही
येणाऱया काही दिवसांमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आणि पश्चिमेकडे सरकण्यास सुरवात झाली तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात खूप पाऊस पडू शकेल. अजून जुलैच्या मध्यावर आहोत अजून दोन-अडीच महिने आहेत. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असा दिलासा कृष्णानंद होसाळीकर यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या