महाराष्ट्र दिनापासून राज्य बँक कैद्यांना देणार कर्ज, येरवडा कारागृहापासून होणार सुरुवात

कारागृहात वर्षानुवर्षे शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. त्यासाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजना आणली असून त्याची सुरुवात 1 मे महाराष्ट्र दिनी येरवडा कारागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे. पहिल्या टप्प्यात 222 कैद्यांना त्यांच्या कारागृहातील उत्पन्नाच्या आधारे कर्ज दिले जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही राज्यातील सहकारी बँकांची शिखर बँक असून त्यांच्याकडून नेहमीच सामाजिक बँकिंगला प्राधान्य दिले जाते. त्या पार्श्वभूमीवर दीर्घ मुदतीची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी, शेतीची कामे करण्यासाठी, मुलांच्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी, औषधोपचाराकरिता त्यांच्या कारागृहातील उत्पन्नाचा विचार करून कर्ज दिले जाणार असल्याचे बँकेने स्पष्ट केले आहे. या कर्जावर केवळ सात टक्के व्याज लागणार असून त्यासाठी जामीनदाराची किंवा तारण ठेवावे लागणार नाही. तसेच कर्ज परतफेड रकमेच्या एक टक्का निधी बँक कैद्यांच्या ‘कल्याण निधी’साठी देणार आहे.