मानवंदना!

101

महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, पण महाराष्ट्र घडविण्याचे कार्य पुरे झाले नाही. कारण सत्तालोभात इतके जण अडकले की, एकत्रित विचाराला वेळ नाही. नवीन उद्योग येण्याची हूल अधूनमधून सुटत असते, पण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी आटल्या आहेत. देशाचे पोट भरणाऱ्या महाराष्ट्राने इतके हतबल होऊ नये. ‘महाराष्ट्र जगला तर राष्ट्र जगेलअसे म्हणायला तरी महाराष्ट्र स्वतःच्या पायावर उभा राहू द्या. मोठा संघर्ष करून मुंबईवर पुन्हा भगवा फडकला आहे, महाराष्ट्रावरही भगवा फडकेल. हीच १०५ हुतात्म्यांना खरी मानवंदना ठरेल.

१०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून, अनेकांच्या त्यागातून महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. नव्या पिढीस या त्यागाची आणि बलिदानाची कल्पना आहे काय? ‘बाहुबली’ चित्रपटासाठी दोन किलोमीटरच्या रांगा लावणाऱ्यांनी १०५ हुतात्म्यांचे नुसते स्मरण केले तरी पुरे. १९६० नंतर जन्मलेल्या नव्या पिढीला संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे महाभारत नव्याने समजावून सांगण्याची वेळ दुर्दैवाने आली आहे. १ मे हा कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन. मुंबईसह महाराष्ट्र मिळावा म्हणून मुंबईचा गिरणी कामगार रस्त्यावर उतरला. मोरारजी देसाई नामक कसायाने मुंबई महाराष्ट्राला मिळू नये म्हणून सर्व तऱ्हेची दडपशाही केली. त्या दडपशाहीच्या बंदुकांची पर्वा न करता कामगार लढण्यासाठी रस्त्यावर उतरला तेव्हा कुठे ही मुंबई आपल्याला मिळाली. महाराष्ट्राचा लढा हा प्रामुख्याने मुंबईचा आणि बेळगावचा होता. हुतात्म्यांच्या बलिदानातून मुंबई मिळाली, पण साठ वर्षांत अनेकदा सीमा बांधवांचे रक्त सांडूनही बेळगावसह सीमा भाग महाराष्ट्रात येऊ शकलेला नाही. बेळगावचा लढा आणि त्यासाठी झालेले हौतात्म्यही आजच्या पिढीस ज्ञात नाही. जागतिकीकरणाच्या वावटळीत अस्मिता व भावनेला स्थान उरले आहे काय? असा प्रश्न त्यामुळे पडतो. ज्या अखंड अशा संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा झाला व पंडित नेहरूंसारख्या

सर्वात बलवान राज्यकर्त्यांस

महाराष्ट्राने नमवले त्या महाराष्ट्राचे आजचे राज्यकर्तेच महाराष्ट्र पुन्हा तोडण्याच्या विचाराने भारावले आहेत हे त्या १०५ हुतात्म्यांचे दुर्दैव! तुकारामाने गाथा लिहावयाची आणि मंबाजीने राज्य करायचे असेच हे झाले. शेवटी हा महाराष्ट्र ज्या हेतूसाठी आणि ध्येयासाठी मिळवला ती उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत काय? मराठी जनतेच्या आशाआकांक्षांना विश्वासाचे पंख मिळाले आहेत काय? राज्यकर्ते बदलत राहिले, खुर्च्यांवरच्या माणसांची अदलाबदल झाली. जुन्यांच्या जागी नवे बसले, त्यांचे स्वागत व महाआरत्यांचे सोहळे पार पडले तरी शेतकऱयांच्या आत्महत्या व त्यांच्या कुटुंबांचे निराधार होणे काही थांबले नाही. मुंबई शहरावर मराठी माणसांची पकड राहू नये यासाठी ‘राष्ट्रीय’ कारस्थाने मागच्या पानांवरून पुढे सुरूच आहेत. नवे राज्य आले की, नव्या विटी-दांडूचा खेळ सुरू होतो. राज्यकर्त्यांच्या आश्वासनांनी लोकाचे पोट भरत नाही. महाराष्ट्र कधीकाळी देशात अव्वल होता तो आज भ्रष्टाचारात अव्वल झाल्याचे ‘पारदर्शक’ चित्र आहे. कारण भ्रष्टाचाराचा पैसाच निवडणूक जिंकण्यासाठी वापरला जातो. मुंबईसह महाराष्ट्रात अशी भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करून आपापल्या माणसांच्या हवाली केल्याशिवाय त्यातून पुन्हा पैसा निर्माण होत नाही.

पैशाच्या जोरावर सत्ता

आणि नंतर त्या सत्तेच्या बळावर पुन्हा पैसा असे हे चक्र त्यामुळेच सुरू राहते. पंतप्रधान मोदी यांच्या नोटाबंदीनंतरही महाराष्ट्राने भ्रष्टाचारात उसळी का मारली, याचे विश्लेषण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करायलाच हवे. आज समोर आव्हान उभे नाही म्हणून राज्यकर्त्यांची बागायती व जिरायती उत्तम चालली आहे. शेतीबागायती, दुग्धव्यवसाय आजही पाचव्या पायरीवर आहे. स्मार्ट सिटीचा डोलारा मर्जीतल्या ठेकेदारांसाठी आहे. सिमेंटचे काम तिथे पैसा आहे. महाराष्ट्राचा शेतकरी सुखी व संतुष्ट नाही. महाराष्ट्र राज्य निर्माण झाले, पण महाराष्ट्र घडविण्याचे कार्य पुरे झाले नाही. कारण सत्तालोभात इतके जण अडकले की, एकत्रित विचाराला वेळ नाही. रस्ते होत आहेत. शिक्षण संस्था वाढत आहेत. नवीन उद्योग येण्याची हूल अधूनमधून सुटत असते, पण महाराष्ट्रात रोजगाराच्या संधी आटल्या आहेत. देशाचे पोट भरणाऱया महाराष्ट्राने इतके हतबल होऊ नये. ‘महाराष्ट्र जगला तर राष्ट्र जगेल’ असे म्हणायला तरी महाराष्ट्र स्वतःच्या पायावर उभा राहू द्या. मोठा संघर्ष करून मुंबईवर पुन्हा भगवा फडकला आहे, महाराष्ट्रावरही भगवा फडकेल. हीच १०५ हुतात्म्यांना खरी मानवंदना ठरेल. महाराष्ट्र एक व अखंड राहण्यासाठी वचनबद्ध होऊया!

आपली प्रतिक्रिया द्या