महाराष्ट्राला आणखी 200 मेट्रिक टन ऑक्सिजन द्या! केंद्राकडे मागणी

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱया लाटेला तोंड देत असून राज्यातील 16 जिह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची आवश्यकता भासत असून ऑक्सिजन मागणी वाढत आहे.

त्यामुळे केंद्र सरकारकडून सध्या होत असलेल्या पुरवठय़ात 200 मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी 10 टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम पुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्णशय्या यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव सीताराम पुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवले आहे.

राज्यात सध्या 6 लाख 63 हजार 758 सक्रीय रुग्ण आहेत. त्यातील 78 हजार 884 रुग्ण ऑक्सिजनवर असूनची 24 हजार 787 रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल आहेत. त्याचबरोबर राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलढाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या 16 जिह्यांमध्ये सातत्याने सक्रिय रुग्ण वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिह्यात ऑक्सिजन ऑडिट केले जात असल्याचे मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.

लिक्विड ऑक्सिजनचे 10 टँकर्स उपलब्ध व्हावेत

केंद्र शासनाला लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई व अन्य देशांतील तेल उत्पादक पंपन्यांकडून आयएसओ टँकर्स मिळाले आहेत. त्यातील किमान 10 टँकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत जेणेकरून ओडिशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणे सोपे होईल, असेही मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटले आहे.

जामनगर, भिलाई येथून ऑक्सिजन मिळावा

ऑक्सिजन पुरवठा वाढवतानाच केंद्राकडून मिळणाऱया ऑक्सिजनच्या लिफ्टिंगची सुविधा राज्याच्या नजीक असावी, सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला 125 मेट्रीक टन ऑक्सिजन पुरवठा होत असून त्यात 100 मेट्रीक टनाने वाढ करून दिवसाला 225 मेट्रीक टन आणि भिलाई येथून 230 मेट्रीक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे. भौगोलिकदृष्टय़ा ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल.

आपली प्रतिक्रिया द्या