तेलंगणाच्या प्रांगणात मराठीचा नारा

30

[email protected]

महाराष्ट्रापलीकडे स्वत:ची ओळख नेत समाजासाठी, स्वत:साठी वेगळं विश्व तयार करणारी माणसं निश्चितच आदर्शवत असतात. महाराष्ट्रदिनानिमित्त अशाच काही वेगळ्या वाटांवरच्या मराठीजणांच्या कामाचा हा परिचय.

१९ एप्रिल २०१७ रोजी ‘मराठी साहित्य परिषद तेलंगण राज्य’ या संस्थेने आपला ५९वा वर्धापनदिन साजरा केला. ग्रंथ प्रकाशने व बहुभाषिक चर्चासत्रे, अन्य हिंदुस्थानी भाषांतील उत्तम साहित्याची ओळख करून देणारे ‘पंचधारा’ त्रैमासिक व ‘मराठी महाविद्यालय’ असे त्रिविध कार्य करीत परिषदेने हीरक महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मराठी भाषा व साहित्य क्षेत्रात काम करणाऱया मराठवाडा साहित्य परिषदेचे १९५६ मध्ये भाषावार आंतररचनेनंतर संभाजीनगरला स्थलांतर झाले. हैदराबादमधील बहुभाषिक वातावरण व आधुनिक मराठी साहित्य व्यवहाराचे महत्त्व लक्षात घेऊन न्या. एकबोटे, प्रा. माढेकर, प्रा. कहाळेकर, प्रा. भुसारी, डॉ. श्री. रं. कुलकर्णी, दिवाकर कृष्ण केळकर या मंडळींनी परिषदेची स्थापना केली. येथे पूर्वी चालू असलेल्या मराठी प्राज्ञ, प्रवेश, प्रथमा परीक्षा वर्गांना नीट रूप द्यायचे ठरवले. उस्मानिया विद्यापीठाच्या प्राच्य विद्या विभागाच्या अंतर्गत पदवी अभ्यासक्रमात मराठीचे शिक्षण अंतर्भूत करून घेतले आणि मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेबरोबरच ‘मराठी महाविद्यालया’ची स्थापना केली. साहित्य संस्थेने पदवीपर्यंतचे शिक्षण देणारे महाविद्यालय चालवण्याचे हे एकमेव उदाहरण आहे. आणि त्यातही महाराष्ट्राच्या बाहेरील राज्यात, मराठी राजभाषा नाही अशा आंध्र प्रदेशात ‘तेलंगण’ हे मराठी महाविद्यालय चालते हे विशेष! या महाविद्यालयात सहा वर्षांतील एकूण ३२ पैकी २२ पेपर फक्त मराठी भाषेशी संबंधित असतात हे या अभ्यासक्रमाचे ठळक वैशिष्टय़.

मॅट्रिक पूर्वीच शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी येथे एक वर्षाचा एन्ट्रन्स अभ्यासक्रम व नंतर २+३ पदवी अभ्यासक्रम पाच वर्षांचा. मराठीचे महाविद्यालय चालवणे अवघड तर खरेच पण विद्यार्थ्यांना येथे शिक्षण मोफत घेता येते ही आणखी एक जमेची बाजू.

महाराष्ट्राच्या सीमा भागातून, आदिलाबाद, निजामबादहून उपजीविकेसाठी शिक्षण अर्धवट सोडून हैदराबादला आलेल्या व स्थानिक मराठी मंडळींना आपल्या मातृभाषेत पदवी संपादन करण्याची संधी मराठी साहित्य परिषदेने उपलब्ध करून दिल्यामुळे इंग्रजी, तेलुगु न जाणणारे गरीब कामगार, गृहिणी किंवा शिक्षणात खंड पडलेल्या शिक्षणप्रेमींना पदवी घेता आली. पदवी मिळाल्यामुळे व मराठी भाषेचा सर्वांगीण अभ्यास झाल्यामुळे शिक्षक म्हणून अनेकजण कामाला लागले. रंगारी, सुतार अशा कामगारांना, शिक्षणाचा आनंद मिळाला. मुख्य म्हणजे त्यांचा आत्मविश्वास जागा झाला व नोकरीत स्थैर्य आले. मराठीबरोबर हिंदी, इंग्रजी, इतिहास विषय असल्यामुळे या कोणत्याही विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन प्राध्यापक होऊन अनेकजण स्थिरावले. पीएच.डी. व विभागप्रमुखही झाले. मराठी विषयाची उस्मानिया विद्यापीठाची बी.ए.ची पदवी घेतल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनाला नवी दिशा मिळाली. इ.स. २००० पर्यंत महाविद्यालयाच्या यशाची कमान चढती होती. १९७५ पासून २०१० पर्यंत द. पं. जोशी हे काम पाहत होते. सुमारे २०० गरजू विद्यार्थी, १० प्रशिक्षित प्राध्यापक यांनी महाविद्यालय गजबजलेले होते. प्राध्यापकांची नेमणूक यूजीसी तत्त्वानुसार होते व त्यांना यूजीसी ग्रेडप्रमाणे आंध्र/ तेलंगण सरकारकडून वेतन मिळते. मात्र इ.स. २०००नंतर एक एक असे पाच प्राध्यापक निवृत्त होत गेले आणि नवीन नेमणुका झाल्या नाहीत. अर्थात परिषदेने हार मानली नाही. निवृत्त प्राचार्यांसह प्राध्यापकही गेली १० वर्षे नियमित येऊन विनावेतन शिकवतात. आजच्या जगातली अगदी दुर्मिळ गोष्ट म्हणजे संस्थेवरील प्रेम व ‘माय मराठी’वरील श्रद्धा होय. अर्थात जीवनपद्धती बदलली, नोकऱयांचे स्वरूप बदलले, सायंकाळच्या वर्गांवर येण्यास मॉलमध्ये नोकरी करणाऱया विद्यार्थ्याला वेळ मिळेनासा झाला. विद्यार्थी संख्या रोडावली. मराठी भाषेचे प्रेम, श्रद्धाही कमी झाली आहे. आज गरजू मुलांना संस्थेच्या महाविद्यालयाचा लाभ होतोच आहे. नेमणुका नाहीत तरी सेवाक्रती प्राध्यापक आहेतच, पण हे असे किती वर्षे चालवणार हा प्रश्न संस्थेसमोर आहे. मराठी महाविद्यालयाला स्वतःची वास्तू नसूनही विवेकवर्धिनी शिक्षण संस्थेने प्रारंभापासून राधाबाई पळणीटकर प्रशाळेची जागा कॉलेजला सायंकाळी वापरण्यास दिली आहे. हैदराबादच्या सहकारी संस्थांच्या मदतीने मराठी महाविद्यालयाची वाटचाल चालू आहे.

मराठी साहित्य परिषदेचे ‘पंचधारा’ त्रैमासिकाचे पन्नासहून अधिक विशेषांक निघाले आहेत. ‘भारतीयांचे इंग्रजी लेखन’ हा विशेषांक आताच प्रकाशित झाला आहे.

परिषदेने ५६ दर्जेदार ग्रंथ प्रकाशित केले. सेतुमाधवराव पगडी यांचे समग्र साहित्य, इंग्रजी व मराठी ६५ ग्रंथ आठ खंडांतून प्रकाशित केले. आता १९ मे २०१७ रोजी पगडी यांच्या १५० मराठी ग्रंथांचे ७५०० पृष्ठांचे सहा खंड मराठी साहित्य परिषद पुन्हा प्रकाशित करीत आहे. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक व प्रसिद्ध इतिहासकार व कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत सेतुमाधवराव पगडी यांचे दुर्मिळ ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवीत आहोत. विद्यमान अध्यक्ष डॉ. विद्या देवधर व कार्यवाह डॉ. शोभा शास्त्र्यांनी आपल्या सहकाऱयांसह हे अवघड पण महत्त्वाचे कार्य समर्थपणे चालवले आहे. माय मराठीची सेवा निस्पृहपणे चालू आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या