बा विठ्ठला, काही चुकले असेल तर माफ कर

706
chandrakant-patil

गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रावर संकटांची मालिका सुरू आहे. कधी दुष्काळ तर कधी महापूर. आता अतिवृष्टीमुळे सारा महाराष्ट्र हवालदिल झाला असून बा विठ्ठला, आमचे काय चुकले असेल तर ते लेकरे म्हणून आम्हाला माफ कर अशी विनवणी श्री विठ्ठलाकडे आपण करणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

शुक्रवारी (दि. 8) कार्तिक एकादशीचा महासोहळा आहे. शासकीय महापूजेसाठी पाटील सायंकाळी पंढरीत दाखल झाले. पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेने भाजपा, शिवसेना महाआघाडीस स्पष्ट बहुमत दिले असतानाही सरकार स्थापन करण्यास विलंब होत आहे ही चिंतेची बाब आहे. त्यासाठी गुरुवारी राज्यपालांना भेटून सद्य राजकीय स्थितीबाबत त्यांना अवगत केले. त्यावर भाजपाचे वरिष्ठ नेते बसून उद्या सरकार बनविण्याबाबत तोडगा काढतील.

आमदार फोडण्याची भाजपाची संस्कृती नाही

भाजपा विरोधी पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या आरोपाबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार फोडण्याची भाजपाची संस्कृती व शिकवण नाही. गेल्या पाच वर्षांत विरोधी पक्षांचे जे नेते आमच्याकडे आले ते सर्व आमची कार्यपद्धती व विकासाचे राजकारण पाहूनच आले आहेत. ज्यांना आमदार फुटण्याची भीती वाटते ती त्यांचीच कार्यपद्धती आहे, त्यांनीच त्याबाबत विचार करावा असा टोलाही त्यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या