चंद्रपूर जिल्हयाच्या राजकारणात भाजपमधील अतर्गत कलह जाहीरपणे उफाळून आला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक देवराव भोंगळे यांना राजूरा विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे दोन माजी आमदारांसह शेकडो कार्यकर्त्यांनी बंडखोरीची भूमिका घेतली आहे.
माजी आमदार संजय धोटे आणि माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी रविवारी राजुरा येथे माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. राजूर क्षेत्राची उमेदवारी जाहीर झालेले देवराव भोंगळे हे स्थानिक नाहीत. त्यांचे कोणतेही कार्य या क्षेत्रात नाही. याशिवाय लोकसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे पक्षाला या क्षेत्रात मोठा फटका सहन करावा लागला, असा गंभीर आरोप माजी आमदारांनी केला. केवळ एका मोठ्या नेत्यांचे समर्थक असल्याने स्थानिकांना डावलून हे बाहेरचे पार्सल स्थानिकांचा माथी मारल्यागेल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे. असे हे पार्सल माघारी बोलावल्यास नाईलाजाने पक्षाच्या विरोधात जाऊन उमेदवार देऊ आणि हे पार्सल पराभूत करू अशी भूमिका या माजी आमदारांनी मांडली. हीच भूमिका आम्ही वरिष्ठ नेत्यांना भेटून त्यांना पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत असे ही ते म्हणाले.