खडसेंसह अनेक नेते संपर्कात! पवारांची गुगली

1081

भाजपचे एकनाथ खडसे यांच्यासह सत्ताधारी पक्षाचे अनेक नेते गेल्या तीन महिन्यांपासून माझ्या संपर्कात होते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला.  ज्यांच्यावर अन्याय होतो ती मंडळी नव्या संधी शोधत असतात. ही प्रक्रिया एका दिवसात होत नाही, त्यामागे मोठी खदखद असते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून आज राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाण्यात त्यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केले. एकनाथ खडसे हे नाराज असल्याने त्यांनी अपक्ष अर्ज भरला.

त्याबाबत आपले मत काय, असे विचारले असता शरद पवार म्हणाले, सत्ताधारी पक्षातील बरेच नेते माझ्याच काय आमच्या अनेक नेत्यांच्या संपर्कात होते. ज्या पक्षात आपण बऱ्याच वर्षांपासून काम करतो त्या पक्षामध्ये आपले भवितव्य नाही असे लक्षात येताच काही जण नव्या संधी शोधत असतात.

सीबीआय, ईडीचा गैरवापर

राजकारणातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना हद्दपार करण्यासाठी सरकार  ईडी तसेच सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करीत असल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. ईडीवर राजकीय दबाव असून तो नेमका कोणाचा आहे याचा शोध घ्यावा लागेल, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ईडीने माझ्याविरोधात गुन्हा नोंदवल्याने पवार कुटुंबीय मुळीच हवालदिल झालेले नाही. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला किती जागा मिळणार असे विचारले असता त्यांनी सांगितले, माझा कोणत्याही आकडय़ांवर विश्वास नाही. ज्यांचा आहे ते कोणत्या क्षेत्रात काम करतात याचा शोध घ्यावा लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या