भुलेश्वरमधील अंगाडियांवर निवडणूक आयोगाची नजर

230

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या काळात मुंबईतल्या भुलेश्वरमधील अंगाडियांवर निवडणूक आयोगाने कडक नजर ठेवली आहे. या अंगाडियांना रोखीच्या मोठ्या व्यवहारांना बंदी घालण्यात आली आहे. कुरीयरचा व्यवसाय असणारे अनेक बडे अंगाडिया आचारसंहिता संपेपर्यंत आपली दुकाने बंदच ठेवतात. किंबहुना निवडणूक आयोगाने तशा सूचनाच दिल्या आहेत.

निवडणुकीच्या काळात अंगाडियांच्या माध्यमातून उमेदवारांकडून मतदारांना पैशांचे वाटप होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर अनेक अंगाडियांकडून मोठे व्यवहार झालेच तर त्यांची निवडणूक आयोगाकडून चौकशी होते. ही सर्व डोकेदुखी मागे लागू नये यासाठी अंगाडिया आपली दुकाने या काळात बंद ठेवत असल्याचे चित्र आहे. काळबादेवी-गिरगाव या पट्टय़ात रोखीचे आणि ज्वेलरीचे व्यवहार अंगाडियांच्या माध्यमातून करण्यात येतात, मात्र हे व्यावसायिक मोठ्या प्रमाणावर रोखीचे व्यवहार हवालाच्या माध्यमातून करतात. परिणामी, त्यांच्यामार्फत मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैशांचे व्यवहार केले जातात. त्यामुळे निवडणूक आयोग त्यांच्यावर कडक वॉच ठेवून असते. जेव्हा एकादा विभाग व्यवहार किंवा खर्चाच्या बाबतीत संवेदनशील म्हणून घोषित केला जातो तेव्हा निवडणूक आयोगाची जबाबदारी वाढत असल्याचे निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले. दरम्यान, निवडणूक काळात या व्यवसायाला मोठा फटका बसत असल्याचे काही व्यावसायिकांनी सांगितले. दिवाळी येत आहे. अशावेळी आम्ही आमचा व्यवसाय कसा काय बंद ठेवू शकतो, आम्ही आमचा घरखर्च कसा चालवणार, असा सवालही अंगाडियांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीत पकडली होती 18 कोटींची रोकड

यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत एका अंगाडिया व्यावसायिकाकडून 18 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती, मात्र या रोकडचा निवडणुकीशी कुठलाही संबंध नसल्याचे चौकशीत उघड झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाने ही रोकड परत केली.

आपली प्रतिक्रिया द्या