मेधा कुलकर्णींना ‘या’ दोन पक्षांनी दिली उमेदवारीची ऑफर

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना यावेळी भाजपने संधी न देण्याचं ठरवलं आहे. त्यांच्याऐवजी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मेधा कुलकर्णींचे तिकीट कापल्याने आणि चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी दिल्याने पुण्यातील ब्राम्हण समाजाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे  या घडामोडी सुरू असताना दुसरीकडे मेधा कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फोन केले आहेत. खुद्द मेधा कुलकर्णी यांनी ही माहिती दिली आहे.

मेधा कुलकर्णी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील यांनी फोन करून उमेदवारीची ऑफरही दिली आहे. ‘आपण मुंबईत असताना जयंत पाटील यांनी फोन केला होता, पुण्याला पोहचेपर्यंत तुम्हाला ‘एबी’ फॉर्म मिळेल’ असं त्यांनी सांगितल्याचं मेधा कुलकर्णी यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांच्याकडूनही आपल्याला फोन आला होता. तुम्ही मेधा कुलकर्णींना उमेदवारी दिल्यास आम्ही तुमच्यासोबत येऊ असं आपल्याला ऑफर देणाऱ्यां पक्षाच्या नेत्यांना कोथरूडमधील मतदारांनी सांगितल्याचं कळाल्याने त्यांनी ही ऑफर दिल्याचं मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.

या दोन्ही पक्षांना आपण स्पष्ट शब्दात नकार दिल्याचं त्यांनी सांगितले आहे. मी पक्षाशी एकनिष्ठ असलेली कार्यकर्ती आहे आणि पक्षाच्या निर्णयाचे,आदेशाचे मी पालन करेन असं मेधा कुलकर्णी म्हणाल्या आहेत. राजकारण हा अनपेक्षिततेचा खेळ आहे मात्र पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे असंही त्या म्हणाल्या. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या उमेदवारीच्या ऑफरबाबत माहिती दिली. चंद्रकांत पाटील यांच्या अर्ज भरण्यासाठीच्या मेळाव्याला आपल्याला आमंत्रण येवो अथवा न येवो आपण तिथे जाणार आहोत असेही मेधा कुलकर्णी यांनी सांगितले आहे. मी पक्षाची सदस्य आहे, त्यामुळे मी या मेळाव्यासाठी जाणार असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या