कापाकापीमुळे फोडाफोडी; भाजप कार्यकर्त्यांनी उमेदवाराची फोडली गाडी

#MahaElection 2019  विधानसभा निवडणुकांसाठीचा अर्ज भरण्याची आज म्हणजेच 4 ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती. यामुळे वेटिंग लिस्टवर असणारे सर्वच पक्षातील नेते आणि त्यांच्या समर्थकांची आज सकाळी अंतिम यादीत नाव झळकणार का याकडे लक्ष लागले होते. ज्यांचे नाव झळकले नाही अशा नेत्यांच्या समर्थकांनी आता उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. भाजपमधील काही आमदारांचे तिकीट कापले गेल्याने समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

भाजप नेते प्रकाश मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी घाटकोपर पूर्वमध्ये मोठा राडा करत पराग शहा यांची गाडी फोडल्याची बातमी समोर आली आहे. भाजपने घाटकोपर पूर्वमधून प्रकाश मेहता यांना उमेदवारी देण्याऐवजी पराग शहा यांना उमेदवारी दिल्यामुळे मेहता यांचे कार्यकर्ता नाराज झाले आहेत. शहा हे आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाऊ नये यासाठी मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जात त्यांच्या गाडीसमोर दुचाकी आडव्या टाकल्या असल्याचे समजते आहे.

दरम्यान, प्रकाश मेहता यांनी कार्यकत्यांची समजूत काढत पराग शहा यांच्या गाडीला जाण्यासाठी वाट करून दिली. मेहता आणि शहा यांचे समर्थक आपसात भिडल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘भांडण करणं, गाड्या फोडणं ही आपली संस्कृती नाही,’ असं म्हणत प्रकाश महेता यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मेहता यांच्या समर्थकांनी ‘तुम्ही अपक्ष निवडणूक लढा आम्ही तुम्हाला निवडून आणू,’ अशा घोषणा देत त्यांना अपक्ष निवडणूक लढवण्यासाठी विनंती केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या