राज्यपाल नियुक्त जागांसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

18638

विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त झाल्या आहेत. त्या जागांवर आमदार होण्याची संधी मिळावी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असून, युवा नेत्यांबरोबर माजी आमदारांनी देखील यासाठी जोरदार लॉबिंग सुरू केली आहे. त्यातच काँग्रेसचा मित्र पक्ष असणाऱ्या पीआरपीने देखील प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्यासाठी एका जागेचा आग्रह धरल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे.

राज्यपाल नियुक्त जागेवर आपली वर्णी लागावी यासाठी काँग्रेसकडे जवळपास 146 इच्छुकांनी अर्ज केले आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची 50 निवेदने प्राप्त झाली आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे माजी आमदार कल्याण काळे, मोहन जोशी, मुजफ्फर हुसेन, यांच्यासाठी तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सचिन सावंत आणि पापा मोदी यांच्यासाठी आग्रही असल्याचे समजते. मिलिंद देवरा यांनी माजी मंत्री नसीम खान यांच्यासाठी प्रयत्न चालवला आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे, प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष चारुलता टोकस, यांच्यासह आशिष देशमुख, माणिकराव ठाकरे, चरणसिंह सप्रा यांनीही नियुक्तीसाठी पक्षाकडे विनंती केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील, विलास लांडे, गुलाबराव देवकर तसेच पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी यापूर्वीच पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षा बाहेरच्यांना संधी न देता पक्षातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि नेत्यांना संधी देण्यात यावी अशी अपेक्षा इच्छुकांकडून व्यक्त केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या