मोदी ‘पाकीटमारा’सारखे लक्ष दुसरीकडे वळवतात – राहुल गांधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जनतेचे लक्ष मूळ मुद्यावरून दुसरीकडे वळवून काही ठरावीक उद्योगपतींसाठी काम करतात. त्यांची रणनीती ही ‘पाकीटमारा’सारखे चोरीच्या आधी दुसरीकडे लक्ष वळवणाऱ्या ‘पिकपॉकेटर’सारखी असल्याची बोचरी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली.

यवतमाळ येथे मंगळवारी झालेल्या प्रचारसभेत बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली. विधानसभा निवडणूक प्रचारात मोदी जेथे जेथे जातात तिथे ते खोटे बोलतात. ते कधी चंद्राकर बोलतात, कधी जम्मू-कश्मीर, तर कधी कलम-370 वर बोलतात. परंतु शेतकरी, बेरोजगार आणि सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चकार शब्दही काढत नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि नोटाबंदीने छोटे व मध्यम उद्योजक, शेतकरी, मजूर आणि गरीबांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारच्या काळात देशातील बेरोजगारीत भर पडली असून येणाऱ्या काळात त्यात अधिक भर पडेल, अशी भीती राहुल गांधी यांनी व्यक्त केली. ज्या जनतेच्या आशीर्वादाने मोदी सरकार सत्तेत आले त्या गोरगरीब जनतेला, समाजातील विविध घटकांसाठी सरकारने काहीच केले नसल्याचे ते म्हणाले.

बंदरे, एअर इंडियाच्या खासगीकरणाचा डाव

कॉर्पोरेट कर माफ करून ठरावीक काही उद्योजकांना त्याचा फायदा पोहचवण्यात आला. बंदरे, एअर इंडिया, कोळसा खाणी आणि पीएसयू यासारख्या देशाच्या मालमत्तेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा डाव असल्याचे राहुल गांधी म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या